उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयातील १६६ ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यासाठी रविवार दि. १८ डिसेंबर रोजी सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले. आठ तालुक्यात मिळुन सरासरी ७६.४९ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.  विशेष म्हणजे महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, भाजपचे अामदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. 

रविवार दि.१८ डिसेंबर रोजी जिल्हयातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ढोकी, सास्तुर, तेर, जेवळी, माकणी, डिकसळ, रूईभर, पाडोळी, सारोळा आदी १६६ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. उस्मानाबाद तालुक्यात ४५ ग्रामपंचायतीसाठी  ७४.९२ टक्के मतदान झाले. तुळजापूर तालुक्यात ४८ ग्रामपंचायतीसाठी ८१. ७९ टक्के मतदान झाले. उमरगा तालुक्यात २३ ग्रामपंचायतसाठी ७२.८१ टक्के मतदान झाले. लोहारा तालुक्यात १२ ग्रामपंचायतसाठी ७१.२८ टक्के मतदान झाले. कळंब तालुक्यात ३० ग्रामपंचातीसाठी ७९.७१ टक्के मतदान झाले. वाशी तालुक्यात ४ ग्रामपंचायतीसाठी ८१.९२ टक्के मतदान झाले. तर भूम तालुक्यात २ ग्रामपंचायतीसाठी ७७.७६ टक्के मतदान झाले. परंडा तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी ८५.२८ टक्के मतदान झाले. असे सरासरी ७६ .४९ टक्के मतदान जिल्हयात झाले आहे. रात्री उशीरापर्यंत ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाच्या पेट्या तहसील परिसरात येत होत्या. त्यामुळे मतदानाची सविस्तर माहिती मिळण्यास रात्रीचे ११ वाजले होते. 

२० डिसेंबरला मतमोजणी 

जिल्हयातील १६६ पैकी १६५ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी ८ ही तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.मतमोजणी होईपर्यंत ग्रामीण भागात निवडणुकी संदर्भात अनेक अंदाज बांधले जात आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर अनेक गावातील नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाग घेतला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोन यशस्वी होतो यावरच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी  मिळणारे उम्मेदवार निश्चित होतील, असे मानले जात आहे. या निवडणुकीत माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, अामदार राणाजगजितसिंह पाटील व त्याच्या परिवाराने तेर येथे मतदान केले. तर ठाकरे गटरे शिवसेना गटाचे आमदार कैलास पाटील यांनी आपल्या परिवारासह सारोळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले. 

 
Top