उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील जवळे दुमाला व दुधगाव नजीक दोन वेगवेगळ्या घटनेत रस्त्यात जॅक टाकून दोन प्रवासी वाहने अडवत मारहाण करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईलसह ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते तीन वाजेच्या दरम्यान घडल्या.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तामरूल येथील काही प्रवासी लातूर- येडशी रस्त्याने उस्मानाबादकडे येत होते. त्यावेळी त्यांच्या जीपसमोर चोरट्यांनी वाहनाच्या टुलबॉक्समधील जॅक फेकला. यामुळे जीपची गती कमी झाली. नंतर चार जणांनी वाहन अडवून आतील काहींना मारहाण केली. यामध्ये चालक अजय रमेश जाधव यांना अधिक मारहाण करण्यात आली. नंतर जीवे मारण्याची धमकी देऊन कारमधील इतर प्रवाशांची दागिने, मोबाईल व रोख रक्कम मिळून ८३ हजार रुपयांचा ऐवज लुटला. ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. हा प्रकार अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान घडला. घटनेनंतर चालक जाधव यांच्या फिर्यादीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश शिंदे करत आहेत.

  तत्पूर्वी लातूर येथून पांगरी, बार्शी येथील वर्तमानपत्राचे गट्टे घेऊन नामदेव तुळशीराम भालेराव कारमधून लातूर बार्शीमार्गाने जात होते. तेव्हा १.३० वाजता तालुक्यातील दुधगाव नजीक रस्त्यावर पडलेल्या लोखंडी जॅकवर कार आदळल्याने आईलचे चेंबर फुटून गाडी बंद पडली. त्यामुळे चालक नामदेव भालेराव गाडीच्या खाली उतरले. तेव्हा अंधारात दबा धरून बसलेल्या चार चोरट्यांनी चालकास मारहाण करून दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेऊन रोख पैसे किती आहे, याची विचारणा केली. पैसे चोरटयाच्या हाती न लागल्याने गाडी घेऊन जा म्हणून नामदेव भालेराव यास अज्ञात चोरट्याने धमकावले व पसार झाले. भालेराव यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक गाडे, बीट अंमलदार गजेंद्र गुंजकर यांनी केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत हे करत आहेत.

 
Top