उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 2024-25 पर्यंत लाळखरकुत आणि सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेल्ला)  या दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण साद्य करणे हे प्रमुख ध्येय आहे.पशुसंवर्धन विभागाकडे लाळखरकुत रोगप्रतिबंधक लसीचा (4 लाख 26 हजार 700 मात्रा ) साठा उपलब्ध झाला असून सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेल्ला) रोगप्रतिबंधक लसीचा (99 हजार 850 मात्रा) साठा उपलब्ध आहेत. जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत जिल्ह्यातील सर्व गावामध्ये लाळखरकुत आणि (ब्रुसेल्ला) लसीचे शिबीरे आयोजित करण्यात येत आहे.

 लाळखरकुत हा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार असून गायी, म्हसी मध्ये मोठया प्रमाणावर आढळून येतो. लाळखरकुत रोगांमधील बाधीत जनावरांमध्ये ताप येणे, तोंडामध्ये किंवा जिभेवर फोड येणे, पायांच्या खुरामध्ये फोड येवून जखमा होणे, भूक मंदावणे, परिणामी दुग्ध उत्पादन कमी होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. विशेषत: ओढ कामाच्या जनावरांमधील उदा. ऊस वाहतुकीचे बैल यांची कार्यक्षमता मोठया प्रमाणात कमी होते.

 त्याचप्रमाणे  सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेल्ला) हा सुध्दा प्रामुख्याने गायी,म्हैस, शेळया-मेंढया यांना होणारा जिवाणूजन्य आजार आहे. ब्रुसेल्ला हा आजार प्रामुख्याने जनावरांच्या प्रजनन संस्थेशी जोडला गेला आहे. या आजारात जनावरांना ताप येणे, गर्भपात होणे, वंध्यत्व येणे तसेच दुग्ध उत्पादनात घट होणे आदी लक्षणे आढळून येतात.

 तसेच दुग्धव्यवसायाचा कर्दनकाळ समजला जाणारा गर्भपात (ब्रुसेल्ला) या आजारास अटकाव होण्याच्या दृष्टीनेही पशुपालकांकडील 4 ते 8 महिने वयोगटातील मादी वासरांना आणि रेडकांना (ब्रुसेल्ला) या रोगावरील लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

 सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेल्ला) हा बाधीत जनावरांपासून माणसांना होणारा संक्रमक आजार असल्याने याचा मानवी जीवनांवर अतिशय घातक परिणाम होत आहे. पशुपालनाचा व्यवसाय करणारे शेतकरी अथवा पशुपालक (महिला व पुरूष दोघांना) पशुवर उपचार करणारे पशुवैद्यक, कत्तलखाण्यातील कामगार यांना देखील बाधीत जनावरांच्या संपर्कात आल्याने हा आजार होऊ शकतो. या आजारात  वारंवार ताप येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायुंमध्ये तीव्र वेदना, थकवा, हृदयास सूज येणे, संधीवात, भूक मंदावणे, रात्रीच्या वेळी घाम येणे आदी प्रकारची विविध लक्षणे रोगग्रस्त मनुष्यामध्ये दिसून येतात.

  एखादे पशु या आजाराने बाधीत झाल्यास ते जनावर कोणत्याही उपचाराने पूर्णपणे बरे होत नाही. तथापि, 4 ते 8 महिने वयोगटातील मादी वासरांना ब्रुसेल्ला रोगाविरूध्दचे लसीकरण फक्त एकदाच केल्यास ते जनावर त्याच्या संपूर्ण आयुष्यात या आजारास बळी पडत नाही. पर्यायाने पशुपालन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना या रोगाची बाधा भविष्यात होणार नाही आणि या आजारावर नियंत्रण आणल्यामुळे आणि दुग्ध उत्पादनात वाढ झाल्यामुळे पशुपालकांच्या आर्थिक उत्पादनात भर पडणार हे नक्की.

 लाळखरकुत आणि सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेल्ला) या दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण साध्य करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत जिल्हयातील सर्वच पशुपालकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या पशुधनाचे लसीकरण 100 टक्के करून घ्यावे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुजारी.वाय.बी. यांनी केले आहे. 

 
Top