परांडा/ प्रतिनिधी- 

मतदान करणे हा घटनेने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. लोकशाही असलेल्या आपल्या देशात नेता निवडण्याची मिळाली संधी वाया न घालवता त्याचा योग्य वापर केला पाहिजे असे परंडा येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या मतदार नोंदणी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. तहसील कार्यालय परंडा व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ विभागातील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ हरिश्चंद्र गायकवाड हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रेणुकादास देवणीकर हे उपस्थित होते.व्यासपीठावर निवडणूक मतदार नोंदणी नोडल अधिकारी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, प्रा अमर गोरेपाटील, बीएलओ भाऊसाहेब सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले. शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना तहसीलदार देवणीकर म्हणाले की भारत निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधित्व अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. मतदान नोंदणीची प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे तेव्हा अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यावेत व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. यावेळी बीएलओ भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी फॉर्म कसा भरावा, कोणता भरावा, त्या फॉर्म सोबत कोणकोणते कागदपत्र जोडावेत अशा विविध मतदान नोंदणी प्रक्रियेस संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले .

     यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. शेवटी प्रा डॉ सचिन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

 
Top