उस्मानाबाद /प्रतिनिधी -धाराशिव उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय राज्यातील एक अद्यावत व सोयी सुविधांनी परीपुर्ण म्हणुन विकसित करण्याच्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या आराखडा व बांधकामांसह इतंभुत कामकाजाची माहिती घेण्याच्या दृष्टीने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी नागपुर येथील राज्यातील एकमेव AIIMS (ऑल इंडिया इन्स्टीटयुट ऑफ मेडीकल सायंसेस) संस्थेला भेट दिली.

२०१७ मध्ये या सुविधेची पायाभरणी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांनी केली होती. तर दि.११.१२.२०२२ रोजी त्यांच्याच हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले होते. हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून विदर्भ, महाराष्ट्रसाठीच नव्हे तर शेजारील राज्य मध्यप्रदेशसाठी देखील मोठे वरदान आहे. १५० एकरवर पसरलेला विस्तृत असा हा कॅम्पस आहे. येथील मेडिकल कॉलेज, सुसज्ज असे ५०० क्षमतेचे ऑडिटोरीअम, आर.एफ.आय.डी. चा वापर होत असलेली डिजिटल लायब्ररी, प्रत्येक विभागाने त्यांच्या विषयाशी संबंधित खास तयार केलेले संग्रहालय, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, इनडोअर स्टेडियम, हॉस्टेल आदी बाबींची पाहणी केली.

आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ.विभा दत्ता एस.एम. यांच्याशी महाविद्यालयाबाबत सविस्तर चर्चा करुन धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयास मार्गदर्शक मेंटॉर म्हणून काम पाहण्याची विनंती केली. त्यांनी ही विनंती मान्य करत वेळ देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे अशा 'प्राईम' संस्थेचे मार्गदर्शन धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी मिळणार आहे.

धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाकडुन आवश्यकते प्रमाणे निधी उपलब्ध होत असुन सी.एस.आर.च्या माध्यमातुन नविन इमारत व अनुषंगीक बाबींसाठी निधी उपलब्ध करुन घेण्यात येत आहे. यापुर्वी महाविद्यालय व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातारा व बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयांची पाहणी केली आहे. जिल्हयातील नागरिकांना या नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातुन अद्यावत उपचार उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.

यावेळी अधिष्ठाता डॉ.मनीष श्रिगिरीवार, डॉ.गणेश जाधव आदींनी संपूर्ण कॅम्पस दाखविला व सविस्तर माहिती देखील दिली.

 
Top