उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात सण,उत्सव व कार्यक्रम तसेच विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे,मोर्चे,बंद,संप,रस्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. मराठा आरक्षण,ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/संघटना यांचे कडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळणे आणि इतर मागण्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष/संघटना यांचे कडुन धरणे,मोर्चे,उपोषण,आत्मदहन,बंद,निदर्शने,तालाठोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उस्मानाबाद जिल्हयात ग्रामीण-शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा,जत्रा,ऊरूस लहान मोठया स्वरुपात साजरे करण्यात येतात. व्यक्ती,व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष-संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दिनांक 06 डिसेंबर 2022 रोजी महापरिनिर्वाण दिन असून  याप्रसंगी विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात.तसेच दिनांक 07 डिसेंबर 2022 रोजी श्री.दत्त जयंती साजरी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने विविध पक्ष संघटना यांच्याकडून प्रचार सभा,कॉर्नर सभा इत्यादी कार्यक्रम करण्यात येतात तसेच दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान व दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

  तरी वरील प्रमाणे संपन्न होणारे धार्मिक सण/उत्सव, यात्रा,जत्रा,ऊरूस व आंदोलनात्मक कार्यक्रम उस्मानाबाद जिल्हयात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी. अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात येत आहे.

  अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी, यांनी जारी केलेल्या आदेशाव्दारे असे निर्देश देत आहे की, शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीकोनातुन उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 06 डिसेंबर 2022 रोजीचे 00.01 पासुन ते दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी 24.00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी प्रमाणे खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.

 शस्त्र,सोटे,काठी,तलवार,बंदूक जवळ बाळगणार नाहीत, लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील,सहज हाताळता येतील,अशा वस्तु बाळगणार नाहीत,कोणतेही दाहक पदार्थ,किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत,दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत,आवेशी भाषणे,अंगविक्षेपण,विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता,नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे,निशाणी,घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत,जाहिरपणे घोषणा करणे,गाणी म्हणने,वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत,व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत,पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक/मोर्चा काढता येणार नाही.


 
Top