समाजात कोणतीही, कसलीही सामाजिक ओळख नसली तरी अगदी तरुण वयात लहान-मोठी कामे करताना सर्वसामान्यांचे दुःख, अडचणी अगदी जवळून पाहिल्याने परिवर्तनाची मशाल हाती घेऊन न थकता, न हरता त्वेषाने निघालेल्या एका तरुणाने उस्मानाबाद शहरच नव्हे तर संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात आज सहकार, पतपुरवठा, उद्योग, शेती, आरोग्य, राजकारण, समाजकारकण अशी विविध क्षेत्रे पादाक्रांत करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आपण भले नि आपले काम भले हेच धोरण राबवित आज हजारो बेरोजगार हातांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारी ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून आपलेच सर्वसामान्यांतले श्री सिद्धिविनायक परिवारचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी होय. आज त्यांचा जन्मदिवस.. यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा...


जनहिताचे कोणतेही कार्य मनापासून हाती घेतले तर त्यात यश मिळतेच. भले कितीही अडचणी आल्या तरी सर्वसामान्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छांच्या सोबतीने त्यावर मात करता येते, याचे उदाहरण म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात बँकिंग, आरोग्य, शेती, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रात नावारुपाला आलेला सिद्धिविनायक परिवारकडे पाहता येईल. समोर आलेल्या प्रत्येक कार्यात स्वतःला झोकून देऊन कोणतीही अपेक्षा न ठेवता, कोणत्याही प्रसंगात विचलित न होता इतरांना कायम सोबत घेऊन वाटचाल करणे आजकाल दुर्मिळ आहे. परंतु कोणताही राजकीय वारसा, उद्योजकीय पाठबळ नसताना केवळ जनसेवेचा वसा घेऊन निघालेल्या दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ही किमया करुन दाखवली आहे.

सहकार क्षेत्रापासून सुरूवात केलेल्या सिद्धिविनायक परिवारने अल्पावधीतच जनसामान्यांच्या विश्वासाला पात्र राहून कृषीक्षेत्रातही यशस्वी पाऊल ठेवले आहे. कुसळी माळरानाचा म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुळजापूर तालुक्यात जलसंधारणाची कामे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. त्यामुळे या भागात ऊसाचे क्षेत्रही वाढले आहे. ही गरज ओळखून दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सिद्धिविनायक अ‍ॅग्रीटेक इंडस्ट्रीज नावाने गुळ पावडर कारखाना उभारुन खर्‍या अर्थाने इथल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आधार दिला. असे धाडस कोणी ध्येयवेडी व्यक्तीच करु शकते! या कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे तो केवळ दत्ताभाऊ यांच्यावरील विश्वासामुळेच.


या कारखान्याचा गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखानदारीमध्ये एक नव्या दमाचा, धडाडीचा व जनहिताची तळमळ असलेला चेहरा या निमित्ताने समोर आला असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या अपेक्षा देखील त्यांच्याकडून वाढल्या आहेत. तुळजापूर तालुक्यात असलेल्या एकमेव सहकारी साखर कारखान्याव्यतिरिक्त अन्य एक साखर कारखाना उभारला गेला तरी या भागातील ऊस क्षेत्र देखील वाढत गेल्याने शेतकर्‍यांची परवड कायम होती. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्यास अनेक शेतकर्‍यांची मोठी अडचण होत होती. गतवर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालेला असताना दत्ताभाऊ यांनी शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेऊन चाचणी हंगामाच्या काळात देखील सुमारे 62 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करुन शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला

यावर्षीही ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असले तरी आता आपल्याच परिसरात हक्काचा कारखाना उभारल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची काळजी दूर झाली आहे. एकीकडे साखर कारखानदारी मोठ्या अडचणीला तोंड देत असताना नियोजनबद्धपणे काम केल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते, याचा प्रत्यय सिद्धिविनायक परिवारकडे पाहिल्यास आल्याशिवाय राहात नाही. तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत असतानाच कळंब तालुक्यातही सिद्धीविनायकच्या युनिटची वेगात उभारणी सुरु आहे. या कारखान्याची उभारणी झाल्यानंतर चाचणी गळीत हंगामाला देखील सुुरूवात होऊन ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा देण्याचे काम दोन्ही युनिटच्या माध्यमातून होणार आहे. लवकरच सिद्धीविनायक परिवार वैद्यकीय क्षेत्रातही पाऊल ठेवत असून त्याआधी कृषी क्षेत्रात सुरू केलेली दमदार वाटचाल निश्चितच ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देणारी ठरली आहे.


हे ही नसे थोडकेच काय म्हणून कळंब आणि शेजारच्या केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेऊन खामसवाडी येथे सिद्धिविनायकच्या परिवारात आणखी एका युनिटची भर पडत आहे. या कारखान्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून येत्या अडीच महिन्यानंतर म्हणजेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी 19 फेब्रुवारी रोजी या कारखान्याचा चाचणी हंगाम सुरु करण्याचे ध्येय दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ठेवले आहे.

सिद्धिविनायक परिवारने वैद्यकीय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. सिद्धिविनायक परिवारच्या रुग्णालयाची मुहुर्तमेढ लवकरच रोवली जाणार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना अत्युच्च दर्जाची सेवा आणि उपचार उस्मानाबाद येथे मिळू शकणार आहेत.

राजकीय प्रवासात वाटचाल करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये दत्ताभाऊ सुरुवातीपासूनच तन-मन-धनाने वाटचाल करत आले. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आज हजारो कार्यकर्त्यांची फळी उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. त्यांची पक्षनिष्ठा लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. त्यांच्यावर उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही श्रेष्ठींनी सोपविली. या संधीचे सोने करत दत्ताभाऊ यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पंचायत, ग्रामपंचायतींसह गावागावातील सोसायट्यांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवून राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. आपण भले आणि आपले काम भले हीच शिकवण ते कार्यकर्त्यांना सातत्याने देत असतात.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची समस्यांची जाण असलेले उदयोन्मुख नेते, राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जोपासणारे, शेती, सहकार, उद्योग, आरोग्य यासह विविध क्षेत्राच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारे, दुरितांचे पालनहार दत्ताभाऊ कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुनःश्च शुभेच्छा

     नितीन नेताजीराव भोसले

 
Top