उस्मानाबाद /प्रतिनिधी -

सोलापूर- तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी रु. ४५२.४६ कोटींचा आर्थिक सहभाग देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरी मुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा देणारा हा प्रकल्प रखडला होता. आजच्या निर्णयाने या प्रकल्पाला गती मिळणार असून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे. भवानी मातेच्या भाविक भक्तांसह जिल्हावासियांसाठी हा मोठा आनंदाचा दिवस आहे. 'असेआ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ५०% टक्के निधी देण्यास मान्यता मिळाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी कलाटणी देणारा हा प्रकल्प असून धाराशिव हे आता रेल्वे जंक्शन चे शहर होणार आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जावे, ही धाराशिव जिल्हावासियांसह जगभरातील भाविक भक्तांची तीव्र इच्छा होती.  या अनुषंगाने पंतप्रधान ना. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सन २०१९ मध्ये या रेल्वे मार्गास मंजुरी दिली व भूमिपूजनही केले होते. सदरील रेल्वे मार्ग केंद्र व राज्य सरकारच्या ५० % निधीतून मंजूर करण्यात आला होता व राज्यातील इतर प्रकल्पा प्रमाणे यास तत्कालीन फडणवीस सरकारने सहमती दिली होती.

परंतु तदनंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि अनेकदा मागणी करूनही राज्य सरकारच्या वाट्याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली नाही, उलट पक्षी तत्कालीन परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी हा रेल्वेमार्ग पूर्णतः केंद्र सरकारच्या निधीतून होणार असून राज्य सरकारने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे धादांत खोटे वक्तव्य, विधानसभेमध्ये या अनुषंगाने मी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना केले होते. याबाबत त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव देखील दाखल करण्यात आला होता.

आता पुन्हा राज्यात शिवसेना – भारतीय जनता पक्षाचे सरकार आले असून जिल्ह्यातील प्रलंबित मोठे विषय वेगाने मार्गी लावण्यात येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे या रेल्वे मार्गाला राज्य सरकार कडून ५०% निधी देण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता व पुरवणी मागण्यांमध्ये यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यापासून याबाबत दैनंदिन पाठपुरावा सुरू होता. माजी आ. सुजितसिंहजी ठाकूर यांचेही याकामी मोठे सहकार्य लाभले. परिवहन व वित्त आणि नियोजन विभागासह राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे या विषयाची कॅबिनेट नोट तयार होईपर्यंत दैनदीन पाठपुरावा सुरू होता.

आज हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आला व या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा वाटा रु. ४५२.४६ कोटी देण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली.

केंद्र सरकारने या रेल्वे मार्गासाठी आजवर रु. ३२ कोटी निधी दिला आहे.  राज्य सरकार व केंद्र सरकारकडून पुढील काळात भरीव निधी घेवून हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.

 शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पा बाबत तातडीने निर्णय घेतले जात आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या अर्थकारणाला या रेल्वे मार्गामुळे मोठी चालना मिळणार असून मागील तीन वर्षांपासून प्रलंबित विषय मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री ना. तानाजी सावंत यांचे जिल्हावासियांच्या वतीने हार्दिक आभार

 
Top