जळकोट  / प्रतिनिधी- 

जळकोट व पंचक्रोशीतील गरजू नागरिक, शेतकरी, लघु व मध्यम व्यावसायिकांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी रुपामाता अर्बन सोसायटी मदतीचा हात देण्याचे काम करेल असे रुपामाता अर्बनचे संस्थापक अध्यक्ष अॅड.  व्यंकटराव गुंड यांनी उपस्थितांना आश्वासित केले निमित्त होते तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे उस्मानाबाद स्थित मुख्यालय असलेल्या, “ नातं.. व्यवसायापलीकडचं.. “ हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करत असलेल्या रुपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या 7 व्या नूतन शाखेच्या उद्घाटन समारंभाचे. रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड ( पाडोळीकर ) यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2:00 वाजता फटाक्यांच्या आतिशबाजीत उपरोक्त शाखेचे उद्घाटन करण्यात आले.                               

याबाबतचे वृत्त असे की उस्मानाबाद येथे नोंदणीकृत असलेल्या रूपामाता अर्बन सोसायटीचा लोकार्पण सोहळा तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे संपन्न झाला. याप्रसंगी माजी उपसरपंच सौ. श्रीदेवी बसवराज कवठे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव राजगुरू, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम ( पाटील ), अंकुश लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल छत्रे, ठाकरे सेनेचे कृष्णात मोरे, पत्रकार संजय रेणुके, माजी ग्रामपंचायत सदस्या भागाबाई गंगणे, व्यापारी नारायण पटणे, रूपामाता अर्बन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले, रूपामाता अर्बनचे सरव्यवस्थापक विजयकुमार खडके, ढोकी शाखेचे शाखाधिकारी गजानन राजाभाऊ वैद्य, आरोग्य सेवक आण्णासाहेब कोळगे, सराफ व्यापारी नागनाथ राम पोद्दार, निवृत्ती गंगणे, रघुनाथ कागे, अरुण कदम, अशोक बारदाने, श्रीरंग पाटील, सौ. मंगल नागनाथ बंडगर, आदींसह बचत गटाच्या महिला, व्यवसायिक, शेतकरी, मजूर वर्ग व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जळकोट व परिसरातील पत्रकार व मान्यवरांचा रुपामाता उद्योग समूहातर्फे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर जळकोट ग्रामस्थांच्यावतीने रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.  व्यंकटराव गुंड व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णात मोरे, गजेंद्र पाटील, अंकुश लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून रुपामाता अर्बन सोसायटीस जळकोट व परिसरातील नागरिकांकडून सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. रूपामाताचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले यांनी प्रास्ताविकात रुपामाता अर्बनचा लेखाजोखा मांडताना अर्बनच्या एकूण ठेवी 149 कोटी, कर्ज 124 कोटी, सोनेतारण कर्ज 28 कोटी, सभासद 12580, वसुली भागभांडवल 2 कोटी, गुंतवणूक 19 कोटी, राखीव निधी दीड कोटी तर शाखा जळकोटसह 6 असल्याचे सांगितले. तर रुपामाता मल्टीस्टेटच्या ठेवी 157 कोटी, कर्ज 149 कोटी, सोनेतारण कर्ज 12 कोटी, सभासद 12640, वसूल भाग भांडवल दोन कोटी, गुंतवणूक 17 कोटी, राखीव निधी 60 लाख तर शाखा 16 असल्याचे सांगून रूपामाता उद्योग समूहाचा भरभक्कम चढता आलेख उपस्थितांसमोर विषद केला. सूत्रसंचालन मेघराज किलजे यांनी केले तर आभार मिलिंद खांडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूपामाता सोसायटी जळकोट  शाखेचे शाखाधिकारी युवराज माळी, लिपिक प्रसाद जोशी, रोखपाल ( कॅशीयर ) शितल कदम, शिपाई महेश कटुरे, नागरिक नारायण कदम ( वाडीकर ) आदींनी परिश्रम घेतले.

 
Top