उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पुणे येथील जीवनमुक्ती सोशल फाऊंडेशनच्या वतीने काढण्यात आलेल्या भारतीय संविधान जनजागरण रॅलीचे उस्मानाबाद शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, संविधानप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय संविधानाची मूलतत्त्वे सर्वसामान्यांच्या मनामनात रुजावी, या हेतुने पुणे येथील जीवनमुक्ती सोशल फाऊंडेशनने राज्यव्यापी भारतीय संविधान जनजागरण रॅली अभियान सुरू केली आहे. औरंगाबाद येथून सुरू झालेली ही रॅली गुरुवारी दुपारी 12 वाजता शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आली असता, रॅलीचे विविध संस्था, संघटनांनी स्वागत केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. रॅलीसोबत असलेले संस्थापक अध्यक्ष दादासाहेब कांबळे, संविधान विश्लेेषक अनंत भवरे, आसाराम गायकवाड, सुरज वाळके, दीपक लोखंडे, अरुण शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. या यात्रेचा समारोप 26 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.

संविधान विश्लेषक अनंत भवरे म्हणाले की, संविधान जनजागरण रॅलीचा उद्देश हा नागरिकांमध्ये भारतीय राज्यघटनेतील हक्क, कर्तव्य व कायद्यांची  जनजागृती करणे, असा आहे. घटनाकारांनी भारतीयांना इतके महत्त्वपूर्ण अधिकार कायदेशीरपणे देऊन ठेवले आहेत. तेवढे अधिकार जगात कधीही कोणीही आणि कोणालाही दिलेले आपल्याला दिसणार नाहीत. त्या अधिकारांचा प्रसार करण्यासाठी नागरिकांनी संविधानाचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे जिल्हा सचिव अ‍ॅड. सुदेश माळाळे, उपाध्यक्ष सुनील बनसोडे, सहसचिव दीपक सरवदे, अंकुश उबाळे, अ‍ॅड. अजय वाघाळे, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, श्रीकांत चिलवंत, प्रा. रवी सुरवसे, बाबासाहेब बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे स्वामीराव चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, अमोल वाघमारे, दादासाहेब जेठीथोर आदी उपस्थित होते.


 
Top