उस्मानाबाद शहराच्या इशान्येस सहा किलोमीटरच्या टेकडीवर सात लेण्यांचा समूह आहे. हा शैलगृह समूह ‘धाराशिव लेणी’ म्हणून ओळखला जातो. यातील सहा लेणी जैन लेणी मानली जातात. ही लेणी अजिंठा येथील महायान लेण्यांच्या समकालीन म्हणजे इ. स. च्या पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील आहेत. धाराशिव लेणी समूह टेकडीच्या दोन बाजूंवर आहेत. चार लेणी दरीच्या उत्तरेकडे असणाऱ्या टेकडीच्या भागात खोदली आहेत, तर उरलेल्या तीन लेण्या त्या लगतच्या बाजूवर ईशान्यमुख आहेत. जैन लेण्यांसमोरच शिवगुरू महाराज यांची समाधी आणि महादेव मंदिर आहे. त्यालाच गारलेणी या नावानेही ओळखले जाते. धाराशिव लेण्यांचा अभ्यास सर्वप्रथम जेम्स बर्जेस यांनी 1875-76 मध्ये केला होता. प्राचीन लेण्यांच्या वास्तुशिल्पाच्या इतिहासात या लेण्यांचे अनन्य साधारण महत्व आहे.

 धाराशिव येथील जैन लेण्यांचा उल्लेख प्राचीन जैन साहित्यात येतो. इ. स. च्या अकराव्या शतकातील जैन मुनी कनकामर यांच्या ‘करकण्डचरयु’ या प्राकृत ग्रंथाच्या चौथ्या आणि पाचव्या भागात ‘तगर’ या गावाजवळ असलेल्या लेण्यांबद्दल उल्लेख आहे. या ग्रंथानुसार करकण्ड नावाच्या राजाचा मुक्काम तेरापुरच्या दक्षिणेस असलेल्या अरण्यात पडला होता. तेंव्हा तेरापुरच्या शिव नामक राजाने त्याची भेट घेऊन जवळच असलेल्या लेण्यांसंबंधी माहिती सांगितली होती. प्रेक्षणीय अशा या लेण्यांत अनेक स्तंभ आहेत. त्यात पार्श्वनाथाच्या मूर्तीची करकण्ड राजाने पूजा केली. शिवाय या लेण्यांचा त्याने जीर्णोध्दार केला. येथील डोंगरमाथ्यावर वारूळात असलेली एक पार्श्वनाथाची मूर्ती सापडली होती. ती आणून त्याने त्या मूर्तीची लेण्यांत प्रतिष्ठापना केली. इतकेच नव्हे, तर राजाने तेथे या लेण्यांच्या वरील बाजूस आणखी दोन लेण्या खोदल्या.

 तगरपुराजवळच्या या लेण्यांची मुनी कनकामराने दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे. ज्या लेण्यांसंबंधिचे उल्लेख करकण्डचरयु ग्रंथात आलेले आहेत, ती लेणी तेर (प्राचीन तगरपूर) जवळ असलेल्या धाराशिव येथील लेणी आहेत. पावसाळ्यात हा परिसर अत्यंत रमणीय दिसतो.

  राज्य पुरातत्व विभागाने धाराशिव लेण्यांमध्ये केलेल्या साफसफाईच्या वेळी त्याच्या खालील बाजूस पायऱ्या असल्याचे दिसून आले. येथील सहा जैन लेण्यांच्या समूहापैकी लेणी क्रमांक एक अपूर्ण आहे. क्रमांक दोन लेणी अत्यंत भव्य आहे. त्याचा सभामंडप 25.1 मीटर X 25.1 मीटर असा चौरसाकृती आहे. त्यात 32 स्तंभ आहेत. त्यात अजिंठा लेणीतील क्रमांक सहाच्या लेणी याप्रमाणे रंगमंडप आहे. बाजूच्या भिंतीत भिक्षूंसाठी आठ निवासस्थाने खोदलेली आहेत. मागील भिंतीत अशीच सहा निवासस्थाने आहेत. गर्भगृहात सिंहासनावर विराजमान असलेल्या पद्मासन मुद्रेतील पार्श्वनाथाची भव्य मूर्ती आहे. त्याच्यामागे दोन चामरधारी सेवक आहेत. त्याच्या वरच्या बाजूस हातात माळ घेतलेले गंधर्व आहेत. पार्श्वनाथाच्या मस्तकावर सात फड्यांचा नाग आहे.

 लेण्यातील स्तंभाचा आकार, त्याची धाटणी आणि कोरीव काम अजिंठा शैलीचे आहे. पार्श्वनाथाच्या सिंहासनावर समोरासमोर बसलेली दोन हरणे आहेत. त्यांच्यामध्ये असलेली वस्तू स्पष्ट दिसत नाही. परंतु ते धम्मचक्र असावे. या लेण्यांची ओसरी (Verandeh) संपूर्णपणे भंग पावली आहे. त्याच्या समोरील भागात खडक खोदून प्राकार (Count) करण्यात आलेले आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर एक जैन मूर्ती कोरलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस नाग आहेत. ओसरीच्या पश्चिमेकडील टोकास एक पाण्याचा हौद आहे. त्यांच्याजवळ काही सुट्या जैन मूर्ती पडलेल्या आहेत. त्याच्या शिल्पशैलीवरून त्या नवव्या ते दहाव्या शतकातील असाव्यात, असे म्हटले जाते.

  लेण्यांचा एकंदर आकार, त्याची मांडणी, वास्तुशिल्पशैली याच्या अभ्यासावरून त्यांचे अजिंठ्यातील वाकाटककालीन बौध्द लेण्यांशी असलेले साम्य दिसून येते. या लेणी समूहातील उल्लेखनिय लेणी क्रमांक तीन ही आहे. ती आकाराने लहान आहे. तिच्या ओवरी स्तंभांना जोडणाऱ्या पट्टीत उत्कृष्ट कोरीव शिल्प होते, ते आता संपूर्णपणे झिजले आहे. त्याच्या सभामंडपाची रचनाही पाचव्या ते सहाव्या शतकातील बौध्द लेण्यांप्रमाणे आहे. गर्भगृहाची रचना, त्यातील मूर्तीची मांडणी ही क्रमांक दोन प्रमाणेच आहे. मूर्तीच्या आसनामागील धम्मचक्र येथे स्पष्ट दिसते.

 लेणी क्रमांक चार आकाराने लहान आहे. 8.534 मीटर लांब 8.176 मीटर रूंद आहे. आतील खांब भग्नावस्थेत आहेत. लेणी समुहातील शेवटची क्रमांक सातची लेणी अपूर्ण अवस्थेतील आहे. त्यामध्ये सध्या दहा स्तंभ आणि दोन कोपऱ्यात प्रत्येकी एक, असे दोन अर्धस्तंभ असलेल्या 18.28 मीटर रूंदीच्या मुखमंडपाचा समावेश होतो. दगडाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळे स्तंभ घटक्रम ओळखणे कठीण आहे. परंतु या स्तंभावरील भागात या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या, कृष्णलीला दाखविणारा शिल्पपट मात्र तुलनेने चांगल्या स्थितीत टिकून आहे. कृष्णलीलेच्या प्रत्येक दोन दृश्यांमध्ये आणि स्तंभाच्या वरच्या भागात व्याल प्रयोजने आहेत. या पट्टाचा दगड झिजला असल्याने कृष्णलीलेतील काही दृश्यांची हानी झाली असली तरी या शिल्पपटावरील दृश्ये ओळखता येतात. या पट्टावर दाखविलेल्या कृष्णकथामालेला उजव्या कोपऱ्यापासून सुरूवात होते. पहिल्या दृश्यात वासुदेव नवजात कृष्णाला घेऊन जात आहेत, असे दाखविले आहे. कथा वर्णनपर पट्टाच्या शिल्पशैलीवरून आणि मध्ये कोरलेल्या व्यालांवरून ही लेणी अजिंठा येथील उत्तर वाकाटक काळातील लेण्यांच्या समकालीन आहे. त्यांचा काळ साधारणतः इ. स. 450 ते इ. स. 500 असावा.


श्रीकांत चंद्रकांत देशमुख

 जिल्हा माहिती कार्यालय,

 उस्मानाबाद

 
Top