नळदुर्ग /प्रतिनिधी

जानेवारी २०२३ मध्ये खंडोबा यात्रा झाल्यानंतर ज्या वेळेस खंडोबा देव सव्वा दहा महिन्याच्या वास्तव्यासाठी अणदुरला रवाना होतो त्यावेळी अणदुरच्या पुजाऱ्यांनी मैलारपुर येथील खंडोबा मंदिरात पुजा--अर्चा करण्यासाठी थांबु नये. अन्यथा पुजाऱ्यांना मंदिराबाहेर काढुन मंदिराला कुलुप घातले जाईल असा इशारा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा नळदुर्ग येथील खंडोबाचे मानकरी कमलाकर चव्हाण यांनी दिला आहे.

         खंडोबा देवाचे मुळ ठिकाण हे नळदुर्ग (मैलारपुर) हे आहे. मात्र मागे नळदुर्ग--अणदुर मध्ये झालेल्या करारानुसार श्री खंडोबा देवाचे वास्तव्य पावणेदोन महिने नळदुर्ग व सव्वा दहा महिने अणदुर येथे राहील असे ठरले आहे. या करारानुसार अणदुर व नळदुर्गचे मानकरी आजपर्यंत हा करार पाळत आले आहेत. मात्र गेल्या कांही वर्षांपासुन अणदुरच्या पुजाऱ्यांनी मनमानी करीत मैलारपुर येथील खंडोबा मंदिरात वर्षभर पुजा करण्यासाठी ठाण मांडली आहे. वास्तविकपाहता यात्रा संपल्यानंतर ज्या वेळेस खंडोबा देव अणदुरला जातो त्यावेळी अणदुरच्या पुजाऱ्यांनीही मैलारपुर मंदिर सोडणे गरजेचे असताना येथील मिळणाऱ्या उत्पन्नावर डोळा ठेऊन हे पुजारी मैलारपुर येथील खंडोबा मंदिरात ठाण मांडुन बसत आहेत. या प्रकारामुळे नळदुर्गकरांवर मोठा अन्याय होत आहे. मैलारपुर येथील श्री खंडोबा मंदिरावर अणदुर येथील पुजाऱ्यांचा कुठलाच अधिकार नसतांना हे पुजारी आज या मंदिराचे मालक म्हणुन बसले आहेत. यापुढे पुजाऱ्यांचा हा मनमानीपणा नळदुर्गकर खपवुन घेणार नाहीत. असे कमलाकर चव्हाण यांनी म्हटले आहे.

        यात्रा संपल्यानंतर पुढील सव्वा दहा महिने मैलारपुर येथील खंडोबा मंदिरात नळदुर्गचे पुजारी पुजा करण्यासाठी सक्षम आहेत.तो नळदुर्गकरांचा अधिकार आहे. त्यामुळे यात्रा संपल्यानंतर अणदुरच्या पुजाऱ्यांनी स्वता होऊन मंदिर सोडावे अन्यथा पुजाऱ्यांना मंदिराबाहेर काढले  जाईल असा खणखणीत इशारा कमलाकर चव्हाण यांनी दिला आहे.

       नळदुर्गचे खंडोबाचे मानकरी, खंडोबा भक्त व नळदुर्ग शहरांतील नागरीकांनी हा सर्वानुमते निर्णय घेतला असुन यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याला अणदुरचे पुजारी जबाबदार असतील असेही कमलाकर चव्हाण यांनी म्हटले आहे.


 
Top