उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलेल्या सार्वजनिक शोषखड्डेच्या 1 कोटी 12 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात तत्कालीन गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी निलंबित केले आहे. तायडे यांच्या विभागीय चौकशीसाठीचा प्रस्ताव पुराव्याच्या कागदपत्रासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या मार्फत तात्काळ पाठवावा असे आदेशीत केले आहे.

 शोषखड्डे घोटाळ्याचे जनक व मास्टर माईंड असलेले सुरेश तायडे यांचे अखेर निलंबन झाले आहे. या घोटाळ्यात 8 जणावर कारवाई झाली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने तायडे यांच्यासह घोटाळ्यातील ग्रामसेवकांवर सेवा समाप्तीची कारवाई करावी अशी मागणी होत आहेत.

 मग्रारोहयो अंतर्गत खेड,बेंबळी,मेडसिंगा, ढोकी व उपळा येथे शोषखड्डे करण्याचे काम होते यात 1 कोटी 12 लाख 28 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिला होता. तसेच तत्कालीन गट विकास अधिकारी याच्यावर गैरव्यवहारबाबत निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करुन त्यांचेवर शिस्तभंग विषयक कार्यवाहीची शिफारस केली होती त्यानुसार निलंबन करुन त्यांना तुळजापूर पंचायत समिती येथे संलग्न करण्यात आले आहे.

 उस्मानाबाद पंचायत समितीचे तांत्रिक सहायक राकेश पांडुरंग सगर व स्वाती रोहिदास कांबळे यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत तर ग्रामसेवक ए व्ही आगळे व एस बी सुर्वे यांना दोषी ठरवत कारणे दाखवा नोटीस बजावली असून ग्रामरोजगार सेवक रितापुरे, शित्रे व माने यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.


 
Top