उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पोलिस भरतीसाठी एका उमेदवारास एकच अर्ज भरण्याची अट ठेवण्यात आली आहे. ती अट अतिशय अन्याय करणारी असून अनेक ठिकाणी अर्ज भरता यावेत यासाठी परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी पोलिस भरती होण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी रॅली काढत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दि.१६ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, २०२०-२१ मध्ये होणाऱ्या पोलिस भरतीमध्ये शासनाने एका घटकात एकच अर्ज भरण्याची अट ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आली आहे. हे टाळण्यासाठी व न्याय देऊन त्यांना संधी निर्माण व्हावी यासाठी एकाच पदासाठी जास्तीत जास्त अर्ज करता येतील अशी सुधारणा करावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरात लवकर जी.आर परिपत्रक प्रसिद्ध करावे व शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. ही रॅली तुळजाभवानी स्टेडियम येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. या रॅलीचे नेतृत्व सह्याद्री अकॅडमी, सार्थक अकॅडमी व दिशा अकॅडमीचे प्रा. सिद्धेश्वर मते, प्रा. तानाजी शेंडे, प्रा. राहुल सिरसाट, अमोल चव्हाण व बालाजी औटी यांनी केले.  या रॅलीमध्ये पोलिस भरतीसाठी  इच्छूक असलेल्या मुली व मुले हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top