उस्मानाबाद /प्रतिनिधी -

धाराशिव जिल्ह्यात १००० मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा निर्मिती प्रकल्पांसह मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील अशा उद्योगधंद्यांना कारखाना निर्मिती साठी सहकार्य करण्याचा व प्रोत्साहन देण्याचा निर्धार राज्याचे उद्योगमंत्री ना. श्री.उदय सामंत व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विपिन शर्मा यांच्या सोबत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. , अशी माहिती भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम देण्याच्या उद्देशाने विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुद्रा योजना या माध्यमातून रोजगार – स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासह जिल्ह्यात मोठे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

याचाच एक भाग म्हणून वर्षातील अंदाजे ३०० दिवस जिल्ह्यात स्वच्छ सुर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सौर उर्जा निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. २००६ साली तज्ञांच्या अभ्यासातून ‘सौर जिल्हा’ म्हणून हा निष्कर्ष काढला होता व तद्नंतर कौडगाव येथे २५०० एकर क्षेत्रावर एमआयडीसी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातील १५०० एकर जमीन एमआयडीसी कडे उपलब्ध झाली असून यातील ४०० एकर जमिनीवर महाजनकोच्या ५० मे. वॉट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

जिल्ह्याचे सरासरी रेडीएशन ५.७७ kWh/m2/day आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सौरउर्जेवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणे शक्य आहे

तत्कालीन उद्योग मंत्री श्री. सुभाषजी देसाई यांच्या कडे या बाबत सातत्याने ८ वर्ष पाठपुरावा करून देखील त्यांनी साधी बैठक सुद्धा बोलवली नाही पण ना. श्री.उदयजी सामंत यांनी तातडीने बैठक घेत, आपल्या मागणी प्रमाणे सकारात्मक निर्देश दिले आहेत. १००० मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा निर्मिती प्रकल्पांसह मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील अशा उद्योगधंद्यांना कारखाना निर्मिती साठी सहकार्य करण्याचा व प्रोत्साहन देण्याचा निर्धार करण्यत आला आहे. तसेच कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

 
Top