नळदुर्ग / प्रतिनिधी-

 पर्यावरणाचा समतोल राखुन देश प्रदुषणमुक्त रहावा यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी तामिळनाडू राज्यातील नमकल्ला मगनुर जिल्हा सेल्लम येथील अंबु चार्ल्स वय ६० वर्षे हे सायकलीवरून तामिळनाडू ते काश्मीर असा ४ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करीत आहेत.

 अंबु चार्ल्स हे पर्यावरण जनजागृतीसाठी सन २००५ पासुन संपुर्ण देशभर फिरून नागरीकांमध्ये जनजागृतीचे काम करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळा,पोंडेचारी, तेलंगणा, गुजरात राजस्थान हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, ओरीसा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दीप--दमन,कन्याकुमारी, दिल्ली व गोवा या राज्याचा दौरा केला आहे. अंबु चार्ल्स हे हा संपुर्ण भारतभराचा प्रवास सायकलवरून करीत आहेत. ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या गावांतील शाळा व महाविद्यालय तसेच सरकारी कार्यलयाला भेट देऊन अंबु चार्ल्स हे पर्यावरणाचा समतोल राखला जावा यावर विद्यार्थ्यांना व नागरीकांना मार्गदर्शन करतात.आतापर्यंत त्यांनी १० हजार शाळा व महाविद्यालयात यासंदर्भात व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात दोन वर्षे त्यांचे हे काम बंद होते. मात्र कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर आता परत दोन महिन्यांपुर्वी त्यांनी या कामास सुरुवात केली आहे. आपल्या गावातुन दोन महिन्यांपुर्वी या पर्यावरण जनजागृती यात्रेस सुरुवात केली आहे. दि.१८ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक नळदुर्ग शहरात त्यांचे आगमन झाले. यावेळी भाजपाचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, लतिफ शेख, उत्तम बनजगोळे, अमर भाळे,नवल जाधव, सचिन भोई, खाटमोडे यांनी अंबु चार्ल्स यांचा सत्कार करून त्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव केला आहे.

 यावेळी बोलतांना अंबु चार्ल्स यांनी म्हटले की, आज आपला देशच नव्हे तर संपुर्ण जग प्रदुषणाच्या विळख्यात सापडले आहे.आपला देश प्रदुषणमुक्त मुक्त व्हावा यासाठी प्रत्येक नागरीकांनी सायकलचा वापर करावा. दररोज तीन किलोमीटर सायलक चालविली तर मनुष्य हा रोगमुक्त जीवन जगु शकतो. आज माणसाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम ही औषधोपचारावर खर्च होत आहे. हा खर्च टाळण्यासाठी प्रत्येक नागरीकांने दररोज तीन किलोमीटर सायकल चालवावी. सायकल चालविल्यामुळे अनेक रोगांमधुन माणसाची सुटका होते. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही याचा फायदा होतो. असे अंबु चार्ल्स यांनी म्हटले आहे. नेपाळच्या बॉर्डरवर मागे आपल्याला नक्षलवाद्यांनी पकडले होते. मला पोलिस अधिकारी समजुन सलग दहा दिवस माझी चौकशी केली होती.मात्र त्यानंतर मला सोडुन देण्यात आले.

 आता मी पुन्हा त्याच जोमाने पर्यावरण जागृतीसाठी प्रयत्न करीत आहे. मी दररोज २० किलोमीटर सायकल चालवितो. आज प्रत्येक व्यक्तीने सायकलचा वापर करावा. सायकलचा वापर वाढला तर देश प्रदुषणमुक्त राहण्यास मदत होणार आहे.  अंबु चार्ल्स यांचे हे काम राष्ट्रीय हिताचे व मानवल्याणासाठी आहे. त्यांचा हा आदर्श प्रत्येकांनी घेतला तर प्रत्येक व्यक्ती रोगमुक्त राहण्याबरोबरच देश प्रदुषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.


 
Top