उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यात दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन (National Deworming Day) आणि दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी मॉप अप दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्हयातील सर्व एक ते 19 वर्षे वयोगटातील मुलां-मुलींसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा, अनुदानीत शाळांमधून आणि सर्व अंगणवाड्यांमधून कोव्हीड- 19 मार्गदर्शक सूचनांचे अवलंब करुन आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली.

 यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलिस निरीक्षक श्री.व्ही.एस. जैस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकूडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी (वा.सं.) डॉ. सुशील चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (मा.) रत्नमाला गायकवाड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण बी. एच. निपाणीकर, सहा. संचालक (कुष्ठरोग) डॉ. रफीक अन्सारी, डॉ. दिपक मेंढेकर, डॉ. अतुल घोगरे, डॉ. गजानन परळीकर, डॉ. उज्वला कळंबे, दावतुल उलूम या मदरशाचे प्रतिनीधी, जिल्हयातील सर्व वैद्यकिय अधीक्षक आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी, हेमंत पवार, कलीम शेख, तसेच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले की, जंतनाशकाची गोळी सर्वांसाठी मोफत आणि प्रभावी असल्याने जिल्हयातील सर्व पात्र ( 1 ते 19 वर्षे वयोगटातील) बालकांना याचा लाभ देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागासोबतच सर्व संबंधित शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग इत्यादींनी समन्वयाने मोहिम 100 टक्के यशस्वी करावी, असे आवाहन डॉ.ओम्बासे यांनी यावेळी केले.

 प्रास्ताविक करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकूडे यांनी सभागृहास सांगितले की, राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा उद्देश हा एक ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा आणि अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी चावून खाण्यासाठी देवून त्याचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.

 यात मार्गदर्शन करताना जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगीतले की, जंतसंसर्ग थांबविण्याकरिता हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, पायात चपला किंवा बुट घालणे, निर्जंतुक आणि स्वच्छ पाणी पिणे, अन्न व्यवस्थित शिजवून खाणे, निर्जंतुक आणि स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुणे, नखे नियमित कापणे आणि शारीरिक स्वच्छता ठेवणे इत्यादी बाबत आरोग्य शिक्षण देणे हा जंतसंसर्ग टाळण्याचा उपाय असल्याचे सांगून जंतनाशक गोळीच्या सेवनाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे उपस्थितांना सांगितले. यामध्ये जंतनाशकामुळे रक्तक्षय कमी होणे, आरोग्य सुधारणे, बालकांची वाढ भराभर होणे, अन्य संसर्गाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढणे, शाळेतील उपस्थिती वाढणे, बालकाची आकलन शक्ती सुधारणे, दीर्घकाळ काम करणे आणि अर्थार्जनाची क्षमता वाढणे इत्यादी बाबींसाठी मदत होणार आहे. मोहिमेसाठी ग्रामीण भागातील तीन लाख 18 हजार 311 तर शहरी भागातील एक लाख 31 हजार 734 असे जिल्हयातील एकूण चार लाख 57 हजार 45 लाभार्थींना जंतनाशक गोळी देवून जंतापासून संरक्षित करण्यात येणार असल्याचे डॉ.मिटकरी यांनी यावेळी सांगितले.


 
Top