उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 प्रत्येक माणसाच्या जीवनात घडणाऱ्या अप्रिय  घटना किंवा आर्थिक आणि सामाजिक समस्यामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतात आणि नैराश्याचे बळी पडतात. नैराश्य हा मानसिक विकार असून औषध गोळया घेतल्याने त्यातून बाहेर पडणे शक्य आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक गाव पातळीवर मानसोपचारांचे शिबीर घेण्यात येणार, जेणेकरुन आत्महत्त्या थांबवण्यास यश मिळेल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” या उपक्रमांतर्गत भूम तालुक्यातील प्राथ्रुड येथे ग्राम पंचायर्तीच्या प्रांगणात ग्रामस्थांशी चर्चा करताना केले.

  यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, तहसीलदार उषाकिरण शृंगारे तसेच तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी आदी उपस्थित होते.

 ग्रामस्थांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी  शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या समस्या, नैराश्य आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्त्या होऊ नये यासाठी नागरिकांनी निराश आणि हताश झालेल्या व्यक्तीना ओळखून त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रावर पाठविण्याची जबाबदारी घ्यावी,असे आवाहन केले.

 ग्रामीण भागात अनेक कारणांमुळे होणाऱ्या आत्महत्त्या, त्याची कारणे प्रशासनाने समजून घेऊन त्यावर कोणत्या उपाय योजना करुन धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी राज्यात दि.1 सप्टेंबर पासून कृषी विभागामार्फत सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे भूम तालुक्यातील पाथ्रुड आणि वरुड या गावांना भेटी दिल्या. तेथील गावी झालेल्या आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील अजय शिंदे, विठ्ठल रघुनाथ पडघम, संतोष बबन काळे आणि बापूराव त्र्यंबक टेकाळे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियासोबत चर्चा केली आणि सांत्वन केले. तसेच बाधित कुटुंबियांना शासन स्तरावरुन शक्य असलेली मदत करण्यासाठी  उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

 त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सर्व अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्याशी गावातील शेतकऱ्यांच्या पीकविमा समस्या तसेच ई-पीक पाहणी ॲप संदर्भात मार्गदर्शन केले. गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नळ जोडणी तसेच जलजीवन मिशन योजनेंतर्गत ज्या काही ग्रामस्तरावर राबविल्या जातात, त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेशही डॉ.ओम्बासे यांनी यावेळी दिले.

 जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या आयुष्यमान भारत योजना कार्डच्या सुविधेचा लाभ ज्या नागरिकांनी अजून घेतला नसेल त्यांना तात्काळ त्या योजनेबाबत माहिती देऊन जनजागृती करुन लाभ देण्यात यावा, असे  मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी  जिल्हाधिकारी यांनी  वरुड येथील शाळेस भेट दिली आणि येथील पायाभूत सुविधांबाबत आवश्यक सूचना केल्या. तसेच आरोग्य वर्धिनी केंद्राचे कामकाजाचीही पाहणी केली.

 
Top