उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही केंद्र पुरस्कृत योजना 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत “एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP-One District One Product) या आधारावर असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. योजनेंतर्गत केंद्र आणि राज्यशासनाच्या खर्चाचे प्रमाण 60:40 असे आहे. या योजनेत उस्मानाबाद जिल्हयाचा समावेश आहे.

  प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) ही योजना पूर्णपणे PMFME या पोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविली जात आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी प्रकल्प रकमेच्या  35 टक्के (जास्तीत जास्त 10 लाख रूपये) बँक निगडीत अनुदान मर्यादा आहे. योजनेचे स्वरूप असे आहे की , लासुरूवाती योजनेंतर्गत नोंदणी अर्ज केलेल्या लाभार्थींची योजनेसाठी नियुक्त जिल्हा संसाधन व्यक्ती(DRP) मार्फत अर्जाची छाननी करून अर्ज हा जिल्हास्तरीय समितीकडे PMFME या पोर्टलद्वारे ऑनलाईन सादर केला जातो. नंतर या अर्जास जिल्हास्तरीय समितीद्वारे परिपूर्ण छाननी करून मान्यता देण्यात येते. त्यानंतर अर्ज हा लाभार्थ्याने अर्जामध्ये नमूद केलेल्या बँकेकडे जातो आणि लाभार्थ्याचे  कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार योजनेचे लाभार्थी होतात.

  सद्यस्थितीत जिल्ह्याला  योजनेमध्ये 163 लक्षांक प्राप्त असून 19 प्रकरणे मंजूर झालेली आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कच्चा शेतमाल प्रक्रिया करून विकला तर त्याला बाजारात चांगला भाव मिळू शकतो. जिल्हयामधील सरमकुंडी आणि कुंथलगिरी ही ठिकाणे खवा आणि पेढा यासाठी प्रसिध्द आहेत. हे पदार्थ बनविण्यासाठी इंधन भट्यांचा वापर केला जातो.त्याऐवजी नवीन अत्याधुनिक ईलेक्ट्रीक भट्टयांचा वापर केला तर वेळ आणि श्रम दोन्हीही वाचू शकते. अत्याधुनिक ईलेक्ट्रीक भट्टयांना या योजनेमध्ये अनुदान उपलब्ध आहे. त्यासाठी त्या भागातील खवा उद्योजक यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.याव्यतिरीक्त इतरही अन्न प्रक्रिया उद्योग करण्यास इच्छुक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 तरी  प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) पूर्णपणे शेतकरी आणि ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया करणारे उद्योजक यांच्यासाठी असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  महेश तिर्थकर आणि योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी अधिकाअधिक लाभार्थ्यांनी योजनेमध्ये अर्ज करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

 
Top