लातूर  / प्रतिनिधी- 

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन रूग्णांवर मेंदू कॅन्सरच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. या रूग्णांना जीवनदान मिळाले असून, कॅन्सरच्या चौथ्या टप्यात असलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने डॉक्टर मंडळींचे कौतुक होत आहे.

६५ वर्षीय आजोबा बेशुद्ध अवस्थेत अचानक उजव्या हात आणि पायाची ताकद कमी झाल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात गेल्या आठवड्यात उपचारानिमित्त दाखल झाले. त्यांची ‘एमआरआय’सारख्या सर्व तपासण्या केल्या. या तपासणीत मेंदूच्या डाव्या बाजूस कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले. महाविद्यालयातील मेंदू तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. शस्त्रक्रियेनंतर सातव्या दिवशी रूग्ण पायी चालत घरी गेला. अशा प्रकारची गुंतागुंतीची, खर्चिक कर्करोगाची पहिलीच शस्त्रक्रिया शासकीय रूग्णालयात पार पडली. तसेच ६० वर्षीय आजी १ ऑक्टोबर २०२२ रोजी मेंदूच्या कर्करोगाची गाठ मेंदूत पसरून कवठीच्या बाहेर आली असता त्या उपचारासाठी शासकीय रूग्णालयात आल्या. आजीचे एमआरआय व इतर तपासण्या, चाचण्या करून त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया डॉ. बरडे यांनीच केली. ती यशस्वी झाली.

दोन्ही रूग्णांचे वय जास्त होते. मेंदू कर्करोगाचा गंभीर स्वरूपाचा आजार असल्याने या आजाराच्या शस्त्रक्रियेतून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. तरी देखील अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितीन बरडे, डॉ. जी. एल. अनमोड, डॉ. जी. ए. स्वामी, डॉ. एम. जे. चावडा, डॉ. आर. जे. कासले, डॉ. शैलेंद्र चौहान, डॉ. देशमुख, डॉ. जोशी व परिचर्यांच्या देखरेखेखाली रूग्णाच्या मेंदूच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. या दोन्ही शस्त्रक्रिया म. ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत केल्या. या शस्त्रक्रियेस लागणारी सामग्री, साहित्य उपलब्ध करून देऊन डॉ. मेघराज चावडा, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी प्रोत्साहन दिले. अशा प्रकारची शस्त्रक्रिया शासकीय रूग्णालयात प्रथमच झाली. मेंदू कर्करोगाच्या शस्त्रक्रियांचा लाभ लातूर व आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

 
Top