उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील बुद्ध विहार खुले करावे, कसबे तडवळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आंबेडकर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२७ सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.

 दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकताच त्याचे सभेमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रस्त्यावरील वाहतूक तब्बल २ तास वनवे करण्यात आली.

या मोर्चाचा प्रारंभ भीमनगर येथील क्रांती चौकातून करण्यात आला. हा मोर्चा  त्रिसरण  चौकात आल्यानंतर तेथे सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तर पोस्ट ऑफिस मार्गे संत गाडगेबाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जागा देण्यास तयार असताना देखील ही जागा संपादन करण्यास जिल्हा प्रशासन करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ शाळेसाठी जमीन संपादन करण्याची कारवाई पूर्ण करून आंबेडकर यांचे स्मारक बांधण्याचा मार्ग सुकर करावा. तेर व वडगाव परिसरात पुरातत्त्व विभागकडून उत्खनन करून बौद्ध प्रतीके भारतातील बुद्ध प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांना पाहण्यासाठी खुली करावीत, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील प्रांगणात डॉ आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. तसेच तुळजापूर शहरात डॉ आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची कारवाई तत्काळ करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. 

हा मोर्चा किंग कोब्रा दलित संघटनेचे अध्यक्ष भाई विवेक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था अंतर्गत या मोर्चाचे नियोजन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चिलवंत, विजय बनसोडे, सोमनाथ गायकवाड, मेसा जानराव, आदिनाथ सरवदे, विशाल शिंगाडे, प्रशांत बनसोडे, पुष्पकांत माळाळे, भाई फुलचंद गायकवाड, जयशिल भालेराव, बाबासाहेब बनसोडे, अशोक कांबळे, गणेश वाघमारे आदीसह बौद्ध महिला व बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top