उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यात नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून दि. 26 सप्टेंबर 2022 पासून 18 वर्षांवरील सर्व महिलांच्या आरोग्य तपासणी साठी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान राबविण्यात येणार आहे.

 या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सुरक्षित आणि सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक - आरोग्य सेविका आणि आशा ताई यांच्यामार्फत घरोघरी जाऊन अभियान आणि उपलब्ध सुविधेबाबत माहिती देणार आहेत. तसेच ग्रामसभा आणि स्थानिक पातळीवर सभांचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय अंतर्गत विशेष मेडिकल आणि डेंटल शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत दररोज माता आणि महिलांच्या तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून उपचार शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य वर्धिनी केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत. यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देऊन 18 वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा तसेच सुरक्षित आणि सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आवश्यकते नुसार संदर्भितही  करण्यात येणार आहे.

 यामध्ये विशेषतः नवविवाहित महिलांची तपासणी करून समुदेशन करण्यात येईल तसेच गर्भधारणपूर्व काळजी, कुटुंब कल्याण कार्यक्रम, अपत्या मधील अंतर, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया या सेवा आणि त्या बाबत माहिती देण्यात येईल.

 त्याच प्रमाणे सर्व महिलांचे वजन आणि उंची घेऊन BMI काढणे, प्रयोगशाळा तपासण्या करणे, 30 वर्षांवरील सर्व महिलांचे कर्करोग स्क्रीनिंग, रक्तदाब स्क्रीनिंग, मधुमेह स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. तसेच अति जोखमीच्या मातांची तपासणी, बालकांची तपासणी आणि लसीकरण करण्यात येईल, रक्तगट तपासणी, आवश्यकते नुसार लोहयुक्त गोळ्या, कॅल्शियम मोफत देण्यात येणार आहे. तसेच मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती इत्यादी बाबत समुदेशन करण्यात येईल. रुग्णालय स्तरावर उप्लब्धते नुसार आणि आवश्यकते नुसार सोनोग्राफी करण्यात येणार आहे.

 तरी वरील प्रमाणे जिल्ह्यातील सर्व 18 वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांनी नवरात्री दरम्यान दि.26 सप्टेंबर 2022 पासून होणाऱ्या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी केले आहे.

 
Top