उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून नेता ते राष्ट्रपिता या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्र‌ तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव महाविद्यालय स्तरावर निकाली काढण्यास मदत होत आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या व्यक्तींना जात पडताळणी करून घ्यायची असेल अशा सर्वांनी ऑनलाईन व ऑफलाईन परिपूर्ण प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष बी.जी. पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२७ सप्टेंबर रोजी केले.

समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य बलभीम शिंदे उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची जनजागृती करण्यासाठी ११ वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ८ वीपासून पुढील विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी आवश्यक असलेला‌ परिपूर्ण प्रस्ताव गावस्तरावरच भरून देता यावा यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव घेण्यात येणार आहेत.  या जात पडताळणी मोहिमेचा मुख्य उद्देश मागास नसलेल्या जातींना मागासवर्गीय जातीचा लाभ मिळू नये हा आहे. हे काम करण्यासाठी जात पडताळणी समितीच्या तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष, उपायुक्त व संशोधन अधिकारी तथा सचिव यांचा समावेश आहे. ही मोहीम अखंडपणे सुरू राहणार असून एप्रिलमध्ये देययखील अशा पद्धतीची मोहीम राबवली होती. त्यामुळे या समितीकडे ५५०० प्रस्ताव सुनावणीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी ८० प्रस्ताव ३ महिन्याच्या आतील प्रलंबित आहेत. तर रोजच्या रोज प्रस्ताव निकाली काढण्याचे काम सुरू आहे. 

विशेष म्हणजे जात वैधता प्रमाणपत्रासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक व बंधनकारक आहे. मात्र ज्यांच्याकडे आवश्यक पुरावे नसतील अशा साठी स्वतंत्र पथक त्या गावी जाऊन त्या कुटुंबास भेट देऊन सर्व परिस्थितीची पाहणी करून त्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 
Top