उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यात व देशात भाजपला समर्थपणे शरद पवार तोंड देत असल्यामुळेच पत्राचाळ प्रकरणी त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. 

उस्मानाबाद जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आढावा घेण्यासाठी जयंत पाटील बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चांगले काम चालू असल्याचे त्यंानी सांगितले. यावेळी पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तरे देताना पत्राचाळ प्रकरणी  बिनबुडाचे खोटे आरोप केले जात आहेत. त्यावेळी शरद पवार हे केंद्रीय मंत्री होते. त्यांनी सचिवासोबत बैठक घेऊन ८०८ कुटुंबाबाबत नियमानुसार योजनेत बसवुन त्यांना घरे द्या, असे सांगितले होते. तत्कालीन जीआर प्रमाणे डेव्हलपर यांना  काम करता येत नव्हते. यावेळी माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, अॅड. महोमद खान पठाण, बसवराज पाटील नागराळकर हे निरीक्षक म्हणुन तर जिल्हाध्यक्ष सूरेश बिराजदार, संजय पाटील दुधगावकर, माजी आ.राहुल मोटे, प्रतापसिंह पाटील, मसुद शेख, सक्षणा सलगर , नंदकुमार गवारे आदी उपस्थित होते. 

बारामतीचा मतदार जागरूक

यावेळी पत्रकारांनी भाजपने मिशन बारामती हा कार्यक्रम ठरविला असून त्याबाबत आपले मत काय, असे विचारले असता जयंत पाटील यांनी बारामतीचा मतदार जागरूक आहे. देशाची प्रगती होण्यापेक्षा देशाचे सार्वजनिक उद्योग का विकले?  जीवनाश्यक वस्तूवर जीएसटी का लावला ? अर्थव्यवस्था संकटात का येत आहे ? हे सर्व बारामतींकरांच्या मनातील प्रश्नांना भाजप केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन हे उत्तरे देतील, असा टोला लगावला.

दिल्ली दौऱ्यामुळे वेंदात प्रकल्प गेला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना व त्यांच्या चिन्हावर हक्क सांगत आहेत. हे सर्व प्रकरण सुप्रिम कोर्टात चालू आहे. त्याच्या सुनावणीसाठी मुख्यमंत्र्यांना वारंवार दिल्लीला जावे लागते. त्याच प्रमाणे बंडखोरी केलेल्या ४० आमदारांना एकत्र ठेवणे याची मोठी जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. या सर्व कारणामुळे वेंदात प्रकल्प गुजरात मध्ये गेला आहे, अशी टीका करून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विकासात्मक कामाकड लक्ष द्यायला वेळ नाही, असाही टोला लगावला आहे. तसेच मराठा ओबीसी आरक्षणा संदर्भात उपसचिव समितीने योग्य निर्णय घ्यावा, असेही पाटील म्हणाले. 


 
Top