उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, स्थानिक तरुणांच्या मदतीमुळे तत्परतेने आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. प्राथमिक शाळेचे २० पेक्षा जास्त विद्यार्थी या वाहनातून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे. वाहनाने पेट घेतल्याचे समजताच स्थानिक तरुणांनी तातडीने मुलांना बाहेर काढल्याने सर्व विद्यार्थी सुखरुप बाहेर आल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

 घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, स्कूल बस असलेली टेम्पो ट्रॅव्हलरने सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास पेट घेतला. भरवस्तीत बसने पेट घेतल्याने स्थानिकांचा काही काळ गोंधळ झाला. तरुण ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील मुलांना तातडीने बाहेर काढण्यात आले. उस्मानाबाद शहरातील सनराईज इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. उस्मानाबाद शहरातील अरब मस्जिदीसमोर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाची आरटीओ कार्यालयात कोणतीही नोंद नसल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकारीही अश्चर्यचकीत झाले. अत्यंत जुन्या आणि भंगार अवस्थेतील वाहन असल्याने पालक देखील संतप्त होताना दिसले. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.


 
Top