उस्मानाबाद / प्रतिनिधी-

धाराशिव शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार यासारख्या ऐतिहासिक योजनांना एकनाथजी शिंदे साहेबांनी नगर विकास खात्याच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला, हे टिका करणार्‍यांनी विसरु नये. आजही कट्टर, निष्ठावान शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा सामान्य शिवसैनिक आणि जनता तुम्हालाच घरी बसवणार आहे, याची जाणीव ठेवावी, असा पलटवार शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला आहे.

 शिवसेनेशी कायम एकनिष्ठ राहिलेल्यांशी गेल्या अडीच वर्षात प्रतारणा कोण करीत होते, याचा विचार करुनच कोणीही बोलावे. आम्ही आजही शिवसेनेच्या विचारांशी आणि हिंदुत्ववादी विचारांशी एकनिष्ठ आहोत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्वाला तिलांजली देऊन विरुद्ध विचारधारेच्या मांडीला मांडी लावून बसण्यात धन्यता मानणार्‍यांच्या तोंडी एकनिष्ठतेची भाषा शोभत नाही.

 शिवसेनेच्या भगव्यावर प्रेम करणार्‍या कट्टर शिवसैनिकांनी 2019 ला धाराशिव जिल्ह्यातून एक खासदार संसदेत आणि तीन आमदार विधानभवनात पाठविले. तेव्हा धाराशिव जिल्ह्याच्या वाट्याला एखादेतरी मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण गेल्या अडीच वर्षात धाराशिवकरांची घोर निराशा झाली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होताच धाराशिव जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले आहे. विकासरत्न प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांना सार्वजनिक आरोग्य मंत्रीपद मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहेच, धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न सुद्धा आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची चिंता दुसर्‍यांनी करण्याची गरज नाही. असेही शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुखे म्हणाले


 
Top