उस्मानाबाद /प्रतिनिधी

सुमारे १० हजार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कौडगाव एमआयडीसीतील तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची आग्रही विनंती उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री ना. पियुष जी गोयल यांना काल दि. २६/०९/२०२२ रोजी केली आहे.

तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्पालासाठी आवश्यक जागा व इतर पायाभूत सुविधा कौडगाव येथे उपलब्ध आहेत. तांत्रिक वस्त्र निर्मिती हा नव्याने पुढे येत असलेला विषय असून या क्षेत्रात मोठा वाव आहे. कृषी,सैन्य,अंतराळ यासह अगदी रस्ते बांधकाम, क्रीडा व ऑटोमोबाईल सारख्या क्षेत्रात देखील याला मोठी मागणी आहे. देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या विषयाचे महत्व लक्षात घेवून राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशनची स्थापना केली आहे.  

जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, शेती केंद्रित अर्थव्यवस्था व मान्सूनची अनियमित्ता, औद्योगिकीकरणाचा अभाव, कमी दरडोई उत्पन्न व मानव विकास निर्देशांक या बाबी लक्षात घेता कौडगाव औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्प उभारण्याची विनंती तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सन २०१९ मध्ये केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी महाजनादेश यात्रे दरम्यान उस्मानाबाद येथे तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली होती व या अनुषंगाने केपीएमजी या संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक अहवाल देखील तयार करण्यात आला होता. परंतु महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून या विषयाला खीळ बसली होती. तत्कालीन मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे व उद्योग मंत्री ना. सुभाषजी देसाई यांच्याकडे वारंवार विनंती करून देखील यावर काहीही कार्यवाही झाली न्हवती

राज्यात युती सरकार सत्तेत आल्यापासून जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रलंबित विषय मार्गी लागत असून कौडगाव एमआयडीसीतील प्रस्तावित तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्प देखील मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसीने यावर काम करत केंद्रीय वस्त्रोद्योग सचिवांकडे गेल्या आठवड्यात प्रस्ताव पाठविला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे या अनुषंगाने पुन्हा मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची परिस्थिती नमुद करत राज्य सरकारच्या वतीने एमआयडीसीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगत हा प्रकल्प मंजूर करण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती ना. पियुजी गोयल यांच्याकडे काल दि. २६/०९/२०२२ या घटस्थापने च्या शुभमुहुर्तावर केली आहे.

जिल्ह्यातील युवकांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या व जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा हा प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी ताकदीने प्रयत्न चालू राहतील व लवकरच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री ना. पियुष जी गोयल यांची भेट घेणार असल्याचे  आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

 
Top