जिल्ह्याचा सर्वांगीन विकासासाठी शासन कटीबध्द- आरोग्य मंत्री  सावंत 

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हैदराबाद  संस्थान  निजामाच्या  जुलमी राजवटीतून  मुक्त करण्याच्या लढ्याचे नेतृत्व करणारे स्वामी  रामानंद तीर्थ  यांच्या  जिवितकार्याची  पायाभरणी  आपल्या  जिल्ह्यातील  हिपरग्याच्या राष्ट्रीय  शाळेत झाली, याची आजच्या दिनानिमित्ताने  आपल्याला  आठवण  येणे स्वाभाविक  आहे. स्वामीजींच्या  नेतृत्वाखाली  निजाम  राजवटीच्या  गुलामगिरीविरुध्द  लढा देण्यात आला. त्यात आदरणीय गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब  परांजपे,  दिगंबरराव बिंदू, गंगाप्रसाद  अग्रवाल, देवीसिंहजी  चव्हाण, भाई उध्दवराव पाटील, दिगंबरराव देशमुख, कॅप्टन  जोशी असे अनेक स्वातंत्र्य सैनिक सहभागी  झाले होते, त्यांना महिला स्वातंत्र्य सैनिकांनीही या स्वातंत्र्य संग्रामात निडरपणे साथ दिली होती, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहन आणि मराठवाडा मुक्ती स्मृती स्तंभास पुष्पचक्रही अर्पण डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

 यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या जिल्ह्यातील देवधानोरा, नांदगाव, चिलवडी या गावांनी या मुक्तीसंग्रामात इतिहास रचला आहे. यात चिलवडीचे रामलिंग जाधव, देवधानोऱ्याचे महादेव बोंदर, लक्ष्मण बोंदर, उस्मानाबादचे भास्करराव नायगावकर, जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने अशा सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आम्हाला सदैव जाणीव आहे. याही पुढे ही जाणीव राहील, असेही यावेळी डॉ.सावंत म्हणाले.

 राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे, त्याअनुषंगाने जिल्ह्यात मंडळस्तरीय महसूल विषयक सेवांच्या शिबीराचे उद्घाटनही डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.सावंत म्हणाले की, या पंधरवड्यात झिरो पेंडंसीचा अवलंब करुन सर्व प्रलंबित कामे,प्रकरणे निकाली काढावीत. आपल्या कामातून समाजाला समाधान मिळावे या हेतूने गतीशील काम करुन जनसामान्यांचे कल्याण होईल याची दक्षता घ्यावी.


 
Top