उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील दारफळ येथील सोयाबीन पिकांचे पंचनामे युवासेनेचे जिल्हा समन्वयक तथा दारफळ चे विद्यमान सरपंच अॅड. संजय भोरे,तलाठी मंडगे, कृषी सहायक कोळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दर वर्षी जिल्ह्यातील सोयाबीन पिकास अतिवृष्टीचा फटका बसतो परंतु यावर्षी सोयाबीन पिकास वेगवेगळ्या माध्यमातून जबर दणका बसला आहे. कारण यावर्षी अतिवृष्टी सोबतच गोगलगायींनी सोयाबीन खाऊन टाकल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरीही धाराशिव तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यासोबतच येलो मोजेक व्हायरस मुळे सोयाबीनचे प्लॉट चे प्लॉट पूर्णतः पिवळे पडून नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन अक्षरशः गवत उपटून टाकल्यासारखे शेतातून उपटून टाकावी लागली आहे. त्यासोबतच कीटक व अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या शेंगा आळयांनी खाऊन टाकल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगा पाने हिरवी असून देखील झाडालाच चपट्या होऊन वाळल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

या आसमानी संकटातून कुठलाही शेतकरी वाचलेला नाही. तेंव्हा दारफळ ता.धाराशिव शिवारातील शेतकऱ्यांसोबत जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना सरकार व प्रशासनाने सरसकट नुकसान भरपाई देऊन मदत करावी, असे आवाहन युवासेनेचे जिल्हा समन्वयक तथा दारफळ चे विद्यमान सरपंच अॅड. संजय भोरे यांनी केले आहे.


 
Top