उस्मानाबाद/ प्रतिनिधी 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

     प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या उपपरिसर उस्मानाबाद चे संचालक डॉ. डी. के. गायकवाड हे लाभले होते. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे लाभले होते.

    याप्रसंगी आपल्या व्याख्यानात डॉ. डि.के. गायकवाड म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना जगता आली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेचे फायदे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर होतात. राष्ट्रीय सेवा योजनेने भारत देशात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही ग्रामीण भागाचा विकास साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

     तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये घडलेला विद्यार्थी निष्ठेने काम करतो. त्याचबरोबर तो सर्वगुणसंपन्न असतो. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी आदर्श समाज उभारणीसाठी काम केले पाहिजे, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सकारात्मक परिवर्तन निर्माण करणारे विद्यार्थी तयार होत असतात.असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची खूप मोठी परंपरा आहे आणि या महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग सक्षमपणे काम करताना दिसतो.यावेळी त्यांनी 1993 मध्ये झालेल्या भूकंपाची आठवण करून देत सर्वप्रथम भूकंपग्रस्तांना मदतीसाठी धावणारे पहिले महाविद्यालय हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय होते असे ते म्हणाले.

    या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. माधव उगिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिवाजी गायकवाड तर आभार प्रा. मोहन राठोड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व प्राध्यापक व मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते.  सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला .

 
Top