उस्मानाबाद / प्रतिनिधी-
आरटीओ पोलीस असल्याची बतावणी करून परराज्यातील ट्रकचालकांची आर्थिक लूट करणार्या सहा जणांच्या टोळीला उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून नऊ हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सर्व लुटारूंना न्यायालयासमोर उभे केले असता, मंगळवार, 6 सप्टेंबर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान या टोळीच्या इतर गुन्ह्यांचा पोलीस कसून तपास करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी टोळीच्या गुन्हेगारी कृत्याबाबत सांगितले की, कर्नाटक येथील सय्यद सज्जाद पाशा हे ट्रक (क्र. एपी. 39, टीझेड 5116) आंध्रप्रदेश ते जालना असा प्रवास करीत होते. ते 3 सप्टेंबर रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास वाशी तालुक्यातील यशवंडी फाटा येथे आले असता, दोन अनोळखी पुरूषांनी सय्यद पाशा यांचा ट्रक थांबवून, ‘पुढे आरटीओ पोलीस आहेत, ते दंड आकारत आहेत. थोडा वेळ इथेच थांबा व नंतर पुढे जा’ असे म्हणाले. त्यावर सय्यद पाशा यांना रस्त्याच्या बाजूस अगोदरच दोन ट्रक उभ्या असल्याचे दिसल्याने त्यांना विश्वास पटला. त्यांनी आपला ट्रक रस्त्याच्या बाजूस थांबवला असता त्या दोन अनोळखी पुरुषांसह अन्य चार पुरुषांनी सय्यद पाशा यांना धमकावून त्यांच्या सदर्याच्या खिशातील नऊ हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर सहाजण तेथून पसार झाले. सय्यद पाशा यांनी वाशी पोलीस ठाणे गाठून गुन्हा नोंदवला.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, सुदर्शन कासार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, हवालदार दिनेश जमादार यांच्यासह पोलीस मुख्यालयातील 15 पोलीस अंमलदार यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी अलीखान हुसेन अफजल हुसेन (वय 32) जानअली जहर अली (वय 25, दोघे रा. अकोला), मिर्झा जावेद अली यावर अली (वय 45), अन्वर अली किस्मत अली (वय 30, दोघे रा. गेवराई, जि. बीड), युसूफ शराफत अली (वय 41, रा. अंबड, जि. जालना), गुलाब जाफर हुसेन (वय 48, रा. मोहोळ, जि. सोलापूर) या सर्वांना रविवारी भल्या पहाटे 2.17 वाजण्याच्या सुमारास यशवंडी शिवारातून अटक करून लुटीतील नऊ हजार रूपयांची रक्कम व गुन्हा करण्यास वापरलेले तीन ट्रक, दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. गुन्ह्यातील त्यांच्या उर्वरित साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.