उस्मानाबाद (प्रतिनिधी) -

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थानची जमीन गावातील गुरव समाजाने बेकायदेशीरपणे नावे करुन विक्री केल्याचे तसेच गुरव समाजाची बेकायदेशीर एकतर्फी समिती निर्माण स्थापन केलेले ट्रस्ट बरखास्त करुन जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी श्री खंडोबा देवस्थान संघर्ष समितीच्या वतीने   उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.

  मोर्चात अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थानचे मानकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.  उस्मानाबाद शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आलेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. दरम्यान खंडोबा देवस्थान ट्रस्ट बरखास्त करावी यासह एकुण 22 मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

 या धडक मोर्चामध्ये श्री खंडोबा देवस्थान संघर्ष समितीचे अरविंद घोडके, सोमनाथ शेटे, बालाजी कुलकर्णी, दीपक घोडके, बाळकृष्ण घोडके, कल्याणी मुळे, नीलेश मुळे, उमाकांत आलुरे, श्रीशैल्य लंगडे, तिप्पू कबाडे, श्याम गायकवाड, अंकुश कांबळे यांच्यासह देवस्थानचे मानकरी, पुरूष, महिला ग्रामस्थ  सहभागी झाले होते.

  तर घोडके यांना एक लाख बक्षिस देऊ

 अणदूरच्या श्री खंडोबा  देवस्थानचा कारभार अत्यंत पारदर्शक सुरु असून, काही पोटशूळ उठलेली मंडळी देवस्थानच्या शेतजमिनीवर डोळा ठेवून नाहक  बदनाम करत आहेत. खाऊन - पिऊन  चक्री उपोषण करणाऱ्या अरविंद घोडके याने देवस्थानकडे तीन ते चार हजार एकर जमीन असल्याचे सिद्ध केल्यास त्यास एक लाख  रुपये बक्षीस देण्यात येईल आणि  हे खोटे ठरल्यास त्याने देवस्थानची नाक घासून माफी मागावी, असे आव्हान मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिले आहे.

 अरविंद घोडके याने देवस्थानकडे ३ ते ४ हजार एकर जमीन असल्याचे सांगून,गुरव समाज  शेतजमिनीची विक्री करत असल्याचा खोटा आरोप केला आहे. वास्तविक श्री खंडोबा  देवस्थान नावे फक्त ८०० ते ९०० एकर जमीन असून पैकी  २५० एकर जमीन देवस्थानच्या देखभालीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.  ही जमीन छत्रपती शाहू महाराज यांनी तीनशे  वर्षांपूर्वी दान केली आहे. तसे ताम्रपट देवस्थानकडे उपलब्ध आहे.

 श्री खंडोबा  देवस्थान समिती ( ट्रस्ट ) १९६५ मध्ये स्थापन झालेली असून, वेळोवेळी ऑडिट रिपोर्ट - अ मिळाला आहे. तसेच देवस्थान शेतजमिनी संदर्भात औरन्गाबाद खंडपिठाने काही महिन्यापूर्वी आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. देवस्थानची जमीन काढून घ्या, म्हणणे म्हणजे हा हायकोर्ट निकालाचा अवमान नाही का ? असा सवाल ढेपे यांनी विचारला आहे.

 अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही गावाची लोकसंख्या  ५० हजार आहे, दोन्ही गावातील मिळून १०० ते १२० लोकांनी दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला.हा मोर्चा प्रायोजक होता, असा दावा ढेपे यांनी केला आहे. 

 
Top