उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शासनाची योजना हडप करण्याच्या उद्देशाने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करुन बोगस कामगारांची नोंद करुन अनुदान लाटल्याप्रकरणी 7 तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी व 3 दलालावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक व विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी चौकशी करुन दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाने अश्या स्वरूपाचा तपास करुन गुन्हा नोंद करण्याची ही उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. या कारवाईने अधिकारी व दलालांची टोळी हादरून गेली आहे तर या घोटाळ्यातील सर्व 10 आरोपी फरार आहेत.

जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी जे. व्ही. मिटके, एस. आर. सोलंकर, अजिंक्य पवार, एम. आर. काकडे, ए. ए. देशपांडे, एस. जी. वैद्य, जी. एस. राऊत या 7 अधिकारी व घोटाळ्यात सहभागी असलेले प्रमोद रामचंद्र कुलकर्णी (उंबरे कोठा, उस्मानाबाद), सय्यद अतीखउल्ला हुसेनी असदउल्ला हुसेनी (खाजानगर, उस्मानाबाद) व पाशुमिया बाबुलाल शेख (महाळंगी, ता. उस्मानाबाद) या 3 दलाला विरोधात गुन्हा नोंद करणार्‍यात आला आहे. याचा पुढील तपास लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विलास राठोड हे करीत आहेत.

शासनाच्या मालमत्तेची अफरातफर करण्यासाठी या 10 जणांनी संगणमत करुन खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली व त्याचा लाभ घेण्यासाठी वापर केला व प्राथमिक तपासात 2 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली तसेच घोटाळा केल्यानंतर तो उघड होऊ नये, यासाठी पुराव्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेली काही कागदपत्रे नष्ट केली असे तपासात उघड झाले. 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2017 या काळात हा घोटाळा केला असून तो बाहेर काढण्यात लाचलुचपत विभागाला यश आले आहे. हे एक उदाहरण असून या अनुषंगाने लाचलुचपत विभाग या कार्यालयातील इतर योजनांचा तपास म्हणजे एक प्रकारे ऑडिट करणार आहे. नागरिकांना या कार्यालयात सुरु असलेल्या घोटाळ्याबाबत माहिती असल्यास पुराव्यासह संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक संपते यांनी केले आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 13(1)क, 13(1) ड, 13(2) व भादंवीचे कलम 409,420,467,468,471,201 व 34 प्रमाणे आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत विभाग याची चौकशी व तपास करत आहे 

 
Top