उमरगा/प्रतिनिधी-

शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढले, शेतकरी सुखी समाधानी झाले तरच या परीसराचा कायापालट झाला असे म्हणता येईल. चालू हंगामातच कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचे काम सुरू करणार आहोत.चांगला पाऊस व मुबलक पाण्यामुळे ऊसाचे क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. भविष्याचा विचार करून व काळाची पावले ओळखून ६० केएलपीडी  क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. तसेच प्रेसमडवर आधारीत बायो-सीएनजी प्रकल्प येत्या हंगामात सुरु होईल असा आत्मविश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी केले.

मंगळवार दि.२० रोजी मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या २९ व्या वार्षिक  सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादिक काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव,  प्रकाश आष्टे, जिल्हा बँकेचे संचालक दत्ता पाटील, नानाराव भोसले, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड आदीसह सर्व संचालक उपस्थित होते. पुढे बोलताना चेअरमन पाटील म्हणाले की,  सहकारी साखर कारखानदारी टिकवणे काळाची गरज आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे विठ्ठलसाई कारखाना कर्जमुक्त झाला आहे. हे आपले सर्वांचे यश आले आहे. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढले, शेतकरी सुखी समाधानी झाले तरच या परीसराचा कायापालट होईल. वेळेपूर्वी ऊस गाळपास पाठवण्यासाठी प्रयत्न करु नये. कोणीही घाई करु नये. हेक्टरी उत्पादन वाढेल व साखर उताराही चांगला मिळेल. कार्यक्षेत्रातील कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही असे आश्वासन श्री पाटील यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक एम. बी. अथणी यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला व त्यानंतर अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केन अकौटंट राजु पाटील यांनी तर ॲड. विरसंगप्पा आळंगे यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top