उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अनु.जाती, वि.जा.भ.ज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणारे विदयार्थी जात प्रमाणपत्र पडताळणी करीता समितीकडे विहित कालमर्यादेत अर्ज सादर करत नाहीत. त्यामुळे असे विदयार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. या प्रवर्गातील बारावी विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित वेळेत प्राप्त करून घेण्यासाठी तसेच जिल्हयातील विदयार्थ्यामध्ये जाणीव जागृती व्हावी, जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज कसा भरावा, कोणती कागदपत्रे जोडावीत यासह संपूर्ण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्याकरीता जिल्हयामध्ये शिबीरे आयोजित केली जात आहेत.

 त्या अनुषंगाने नुकतेच श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज येथे विद्यार्थ्यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतची जनजागृती करण्यासाठी इयत्ता अकरावी आणि बारावी मधील विदयार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस पुणे येथील महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या वतीने अध्यक्ष डॉ. बी. जी. पवार, संशोधन अधिकारी तथा सदस्य  एस. टी. नाईकवाडी, उपायुक्त तथा सदस्य बलभीम शिंदे, सचिव तथा महाविदयालयाचे संस्थापक अध्यक्ष, कॉलेजचे प्राचार्य साहेबराव देशमुख, उपासे, घाडगे आणि अकरावी तसेच  बारावीचे विद्यार्थी आणि समितीचे कर्मचारीही उपस्थित होते.

 जात प्रमाणपत्र पडताळणी जन जागृती कार्यशाळेमध्ये डॉ.नारनवरे आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या हस्ते इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावी मधील 11 विदयार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या शिबीरात ऑनलाईन पध्दतीने विदयार्थ्याना जात प्रमाणपत्राचा फॉर्म भरण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवराच्या हस्ते महाविद्यालयामध्ये स्थापन केलेले Equal Opportunity Centre (समान संधी केंद्र ) चे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी महाविद्यालचे प्राध्यापक वृंद आणि विदयार्थी उपस्थित होते.


 
Top