उस्मानाबाद /प्रतिनिधी - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्येच सुरु व्हावे यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या समितीने काढलेल्या त्रुटींच्या पुर्ततेचा अहवाल आयोगाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात काल दि. ५/९/२०२२ रोजी जमा करण्यात आला असून या अनुषंगाने लवकरच फेर तपासणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. याच शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील  आहोत. अशी माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जिल्हावासीयांची गरज व मागणी लक्षात घेवून उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा ना. गिरीशजी महाजन यांनी केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा विषय अनेक दिवस प्रलंबित राहिला. सातत्याच्या पाठपुराव्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला मात्र प्रत्यक्षात महाविद्यालय सुरु करण्यासाठी कोणत्याही आवश्यक बाबींची पूर्तता पूर्णपणे करण्यात आली नाही. पदभरती देखील जुजबी स्वरुपात करण्यात आली.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दि.०७.०३.२०२२ रोजी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधान भवन, मुंबई येथे तत्कालीन वैद्यकीय क्षिक्षण मंत्री ना. अमित देशमुख, पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत, पालकमंत्री ना. शंकराव गडाख यांच्यासह जिल्ह्यातील आमदार यांच्या प्रमुख उपस्थित बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत राष्ट्रीय आयुर्विद्यान आयोगाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक पद भरती, जागा निश्चिती व हस्तांतरण, यंत्रसामुग्री व फर्निचर खरेदी तसेच प्रयोगशाळा उभारणे याबाबत सविस्तर चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले होते. या नुसार बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने एक आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र अनेकवेळा पाठपुरावा करून देखील बैठक तर घेण्यात आलीच नाही, परंतु बैठकीचे इतिवृत्त देखील आजवर उपलब्ध करून देण्यात आले नाही. आयोगाच्या निकषाप्रमाणे तयारी न करता समिती बोलावण्यात आली व त्यांनी अनेक गंभीर त्रुटी अहवालात निदर्शनास आणून दिल्या. या त्रुटींची पूर्तता न केल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी नाकारली. 

युती सरकार सत्तेत आल्यापासून या त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात आली व अधिकांश त्रुटींची पूर्तता देखील झाली आहे. या अनुषंगाने काल दि ०५/०९/२०२२ रोजी त्रुटी पूर्ततेचा अहवाल राष्ट्रीय आयुर्विद्यान आयोगा कडे दाखल करण्यात आला आहे. सदरील अहवालाच्या अनुषंगाने लवकरच फेर तपासणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता मिळवून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु व्हावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, व यात नक्कीच यश मिळेल असा विश्वास आहे.

 
Top