उस्मानाबाद /प्रतिनिधी

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणीत झालेल्या चुकीची दुरूस्ती करुन सुधारित वेतनश्रेणीसाठी तीन हजाराची लाच घेतल्याप्रकरणी तुळजापूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून चंद्रकांत माणिकराव गोरे यास उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एका कर्मचार्‍यास सातव्यासातव्या वेतन आयोगा प्रमाणे झालेली वेतन निश्चिती ही चुकीची झाली असल्याने सदरची सुधारित वेतन निश्चिती करून दिल्याचा मोबदला म्हणून तुळजापूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून चंद्रकांत माणिकराव गोरे याने तीन हजार रुपये लाचेची मागणी 4 ऑगस्ट रोजी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कर्मचार्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यावरुन आज (दि.8) अव्वल कारकून चंद्रकांत गोरे याने तीन हजार रुपयाची लाच पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. 

औरंगाबाद विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस अंमलदार  पोलीस अंमलदार मधुकर जाधव, अर्जुन मारकड, सचिन शेवाळे, विशाल डोके, विष्णू बेळे  यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 
Top