उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद नगर परिषदेच्या आवारात झालेल्या भंगार चोरी प्रकरणी स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आनंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात 379 कलम नुसार गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणात नगर परिषद कर्मचारी व ठेकेदार सहभागी असतानाही अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला आहे या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास करुन संबधीत आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद न केल्यास याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य ऍड अजित खोत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

 लाखोंचे सामान चोरी गेलेले असतानाही हे प्रकरण दडपण्यासाठी केवळ 13 हजाराचे सामान चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. आरोपीची नावे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेली असतानाही त्यांच्या नावाने जाणीवपूर्वक फिर्याद दिली गेली नाही. नगर परिषदेच्या मालकीची कचरा विलगीकरण मशीन व पत्रा शेड गायब करुन ते विकले असल्याचा आरोप आपने केला आहे. नगर परिषद कर्मचारी व ठेकेदार यांना वाचविण्यासाठी मुख्याधिकारी येलगट्टे हे प्रयत्न करीत असल्याचा आरोप खोत यांनी केला.

13 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असा गुन्हा नोंद केलेला आहे मात्र चोरीचे सामान विकत घेणाऱ्या भंगारवालाकडून नगर परिषदेने 25 हजार भरून घेतले आहे हाच मोठा विरोधाभास व गुन्हा आहे. चोरी प्रकरणात ठेकेदार सहभागी असल्याने त्याचे बिल अडविले आहे तर सहभागी कर्मचारी   यांची वेतन वाढ रोखली आहे असे मुख्याधिकारी सांगतात मात्र गुन्हा नोंद करीत नाहीत हे सगळे प्रकरण गोलमाल आहे त्यामुळे यात वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्फत तपास करण्याची मागणी आपने केली आहे.

आपने गुन्हा नोंद होण्यापूर्वी पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार दिली आहे त्यात या प्रकरणात सहभागी सर्वांची नावे नमूद आहेत या प्रकरणी आपण सोमवारी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना तर 12 ऑगस्टला पोलीस महासंचालक यांना भेटणार आहे योग्य गुन्हा नोंद न झाल्यास कोर्टात फिर्याद देणार आहे.विशेष म्हणजे गुन्हा नोंद करताना जाणीवपूर्वक उशीर केला जेणे करुन सी.सी.टि.व्ही.फुटेज नष्ट  करता येईल असेही ॲड.खोत यांनी सांगितले  पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष राहुल माकोडे, सचिव मुन्ना शेख, जिल्हा कोषाध्यक्ष विकास वाघमारे आदी उपस्थित होते.

सखोल तपास व्हावा, कोणालाही अभय मिळणार नाही - यलगट्टे

भंगार चोरी प्रकरणी नगर परिषद गंभीर असून सखोल तपास व्हावा यासाठीच अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद केला आहे. तपासात पोलिसांना सर्वतोपारी सहकार्य केले जाणार आहे, त्यात अनेक अनपेक्षित बाबी समोर येतील. चौकशी अहवाल येत्या बुधवारपर्यंत अपेक्षित असून त्यानुसार देखील कारवाई केली जाणार आहे.यात सहभागी असलेल्या दोषीवर प्रशासकीय कारवाई सुद्धा केली जाणार आहे असे मुख्याधिकारी यलगट्टे यांनी माध्यमांशी बोलताना सागितले.

 
Top