उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील सुपरिचित साहित्यिक माधव गरड यांचे शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा या त्यांच्या मूळ गावी दहन संस्कार करण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आज त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्याकरिता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष राहिलेले माधव गरड एक प्रतिथयश साहित्यिक होते. उस्मानाबाद शहरात पार पडलेल्या २८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे जिल्हयातील साहित्य वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिवंगत माधव गरड यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वास आदरांजली अर्पण करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने रविवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक ११.३० वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या सभागृहात या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व परिसरातील साहित्यप्रेमी, मसापाचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मसापच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top