तेर / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर महोत्सवास महीलानी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.
तेर येथील निवासस्थानी माता भगिनींना माहेरवाशिणीचा अनुभव देण्यासाठी गौरीच्या आगमनानिमित्त मंगळागौरीचे खेळ आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून मंगळागौरीचे खेळ करणारा एक ग्रुप आमंत्रित करण्यात आला होता. या सर्व भगिनींनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला.
सर्व सख्यांसाठी श्रावणाच्या सणांच्या लगबगीमधून माहेरपणाचा आनंद लुटण्यासाठी झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी, नृत्य असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले.भर पावसामध्ये तेरसह जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने महीला मराठमोळ्या साज शृंगारासह या कार्यक्रमास उपस्थित होत्या.