उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापूर येथील श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2022 च्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय विभागाकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कामे वेळेत पूर्ण करून हा महोत्सव यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2022 च्या पूर्व तयारीची बैठक घेण्यात आली तेव्हा ते बोलत होते.यावेळी बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि इतर संबंधित अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 या शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरूवात 17 सप्टेंबर 2022 रोजी होणार असून 11 ऑक्टोंबर 2022 पर्यंत विविध पुजा विधी होणार आहेत. या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातून मोठया प्रमाणात भाविक तुळजापूर येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मोठया प्रमाणात या कालावधीत भक्तांची गर्दी होत असते.त्याच बरोबर वाहतूक आणि इतर विविध सुविधा निर्माण कराव्या लागतात. त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज बैठक झाली.या नियोजनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीवर सुक्ष्म नियेाजन करण्यात आले असून विविध विभागाकडे जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या आहेत.

 यात महावितरण कंपनी,सार्वजनिक बांधकाम,आरोग्य विभाग,तुळजापूर नगर परिषद, पोलीस दल, अन्य नागरी पुरवठा विभाग सहायक प्रादेशिक महामंडळ अन्न व औषध प्रशासन, पाणी पुरवठा,मंदीर प्रशासन, उपविभागीय अधिकारी,अपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा माहिती कार्यालय आदींना त्यांच्या कक्षेतील कामांचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रत्येक विभागाच्या कामाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शनही करण्यात आले.


 
Top