नळदुर्ग / प्रतिनिधी-

 सध्या पडत असलेल्या पावसामुळे नळदुर्गच्या प्राचिन व ऐतिहासिक किल्ल्यातील डोळे दिपवुन टाकणारा नर--मादी धबधबा तसेच शिलक धबधबा हे सध्या ओसंडुन वाहत आहेत. दि.७ ऑगस्ट रोजी रविवार या सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटकांनी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊन किल्ला पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला.

        नळदुर्गचा ऐतिहासिक व प्राचिन किल्ला पावसाळ्यात पाहणे म्हणजे एक प्रकारची काश्मीर टूर केल्यासारखे आहे. निसर्ग सौंदर्यात, हिरवीगार वनराई आशा परिस्थितीमध्ये नळदुर्गचा प्राचिन व ऐतिहासिक किल्ला अतीशय सुंदर व अप्रतिम दिसतो. त्यातच सध्या हा किल्ला युनिटी मल्टिकॉन्स कंपनीकडे आहे. युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने किल्ल्यात जी दर्जेदार व अप्रतीम कामे केली आहेत त्यामुळे किल्ल्याला खऱ्या अर्थाने गतवैभव प्राप्त झाले आहे. प्रचिनतेला कुठलीही बाधा न येऊ देता युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने किल्ल्यात अतीशय सुंदर काम केले आहे. या कामांमुळेच आता पर्यटक फक्त पावसाळ्यात नव्हे तर बाराही महिने किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. किल्ल्यात पर्यटकांना युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, पर्यटकांसाठी स्वच्छतागृह, गोल्फ कार, घोडेसवारी आदी उपलब्ध करुन दिले आहेत त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी पर्यटक किल्ल्यात गेल्यानंतर दिवसभर तो किल्ल्यातच थांबतो. युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने किल्ल्यात मोठ्या प्रमाणात विविध जातींची झाडे लावुन त्याची जोपासना केली आहे. त्याचबरोबर किल्ल्यात जागोजागी कारंजे तसेच बारादरी ते उपली बुरुजापर्यंत जागोजागी पर्यटकांना विश्रांती घेण्यासाठी बाकडे ठेवण्यात आले आहेत.

         हा किल्ला पावसाळ्यात आणि तेही किल्ल्यातील डोळे दिपवुन टाकणारा नर--मादी धबधबा व शिलक धबधबा ओसंडुन वाहत असताना पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे.नळदुर्ग शहर व परीसरात सध्या दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र हिरवळ दाटुन आली आहे. या हिरवळीत नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला आणखी खुलुन गेला आहे.

         दि.७ ऑगस्ट रोजी रविवार या सुट्टीच्या दिवशी नळदुर्गचा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांनी किल्ल्यात मोठी गर्दी केली होती. आणखी पावसाळा दोन महिने असल्यामुळे यावर्षी नर--मादी धबधबा व शिलक धबधबा हे दोन्ही धबधबे बरीच दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यटक आणखी मोठ्या संख्येने किल्ला पाहायला येण्याची शक्यता आहे. किल्ल्यात बरीच लहान मोठी दुकाने आहेत. पर्यटक व्यवसायावरच हे लहान व्यापारी टिकुन आहेत. किल्ल्यातील हुलमुक दरवाजा, बारादरी, रंगमहाल, नऊ बुरुज, उपलीबुरुज, पाणीमहाल, रणमंडळ, गणपती महाल, पाणीमहालातील नर--मादी धबधबा, तसेच रणमंडळ जवळील शिलक धबधबा हे किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासारखी आहेत. नऊ बुरुजासारखा बुरुज हे अतीशय दुर्मिळ आहे. राज्यात अनेक किल्ले आहेत मात्र नळदुर्गच्या किल्ल्यातील नऊ बुरुजासारखा बुरुज तुम्हाला कुठल्याही किल्ल्यात पाहायला मिळणार नाही हे नळदुर्गच्या किल्ल्याचे खास वैशिष्ठ्ये आहे. आणि म्हणुनच दरवर्षी लाखो पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी नळदुर्ग शहरात येतात.


 
Top