लातूर /(प्रतिनिधी ) -

जैन समाजात अनेक जण दानशूर व सामाजिक भान  असलेली मंडळी आहेत . दानशूर समाज म्हणून जैन समाजाची ओळख आहे. जैन समाज हा अल्पसंख्यांक समाज असल्याने या समाजातील होतकरू , गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जैन समाजातील धुरिणांनी पुढे यायला हवे. ज्ञानदानाच्या या यज्ञात आपली सेवारुपी आहुती टाकावी , असे आवाहन अल्पसंख्यांक विषयावरील जेष्ठ अभ्यासक , राष्ट्रीय प्रमुख निरंजन जुवा - जैन यांनी येथे बोलतांना केले.  

        भारतीय जैन संघटनेच्या ( बीजेएस ) लातूर जिल्हा शाखेच्या वतीने डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात अल्पसंख्यांकांना मिळणारे लाभ , अधिकार ,जनजागृती अभियान, मार्गदर्शन सभा,  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी जैन बोलत होते .यावेळी आपल्या तासाभराच्या भाषणात निरंजन जुवा यांनी दृकश्राव्याच्या माध्यमातून अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करून अल्पसंख्यांकांना मिळणारे लाभ  , विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थाकडून देण्यात येणारे अर्थसहाय्य , शिष्यवृत्ती यातील बारकावे , सूक्ष्म निरीक्षण नोंदवले .यावेळी निरंजन जैन , हस्तीमल बंब व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला .

     यावेळी मंचावर भारतीय जैन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हस्तीमल बंब , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन , रोटरी क्लब ऑफ लातूरचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध  कर सल्लागार सुनील कोचेटा , सुरेश जैन , सुमतीलाल छाजेड,  कमल शेठ चापसी , महावीर उदगीरकर , सौ. कांचनमाला संगवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

कोरोना काळात भरीव मदत - बंब

भारतीय जन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हस्तिमल बंब यांनी यावेळी लातूर शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की 1993  साली  किल्लारी परिसरात झालेल्या भूकंपामुळे निराधार झालेली मुले आणि कोरोना काळात आई-वडिलांच्या निधनामुळे अनाथ झालेल्या मुला - मुलींच्या पुनर्वसनासाठी’  बीजेएस’  सरसावली असून पुणे येथील  वसतिगृहात या सगळ्यांची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

    अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी आपल्या छोटेखानी  मनोगतात विद्यार्थ्यांनी सगळ्याच क्षेत्रात करिअर करावे . केवळ इंजिनियर , डॉक्टर्स बनण्याचे स्वप्न बघू नये. क्रीडाक्षेत्र , शासकीय सेवेत देखील त्यांना करिअर करता येऊ शकते , असे ते म्हणाले.

     प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप  प्रज्वलन करून भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी.पी. शहा, किशोर जैन व केयूर कामदार यांनी केले. याप्रसंगी सौ.कांचनमाला संगवे,  अभय शहा,  सुरेंद्र कंडारकर , अभिनव शहा, अमृता म्हेत्रे,  प्रणिता रामढवे , शोभाताई कोंडेकर , संतोष उमाटे, अनिल कांबोज आदींची प्रमुख उपस्थिती होती .

 उद्योजक व्यापाऱ्यांशी संवाद

सायंकाळच्या सत्रात अल्पसंख्यांक विभागाचे ज्येष्ठ अभ्यासक , राष्ट्रीय प्रमुख निरंजन जुवा - जैन यांनी उद्योजक, व्यापारी , कर सल्लागार यांच्याशी संवाद साधला . आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना,  सबसिडी याचा लाभ घेत सचोटीचा व्यवसाय कसा करायचा याच्या टिप्सही त्यांनी दिल्या .सुमारे दीड तास त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध कर सल्लागार सुनील कोचेटा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास लातूर किराणा होलसेल असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज अप्पा वळसंगे , महावीर उदगीरकर , हस्तीमल बंब , सौ. कांचनमाला संगवे आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. अब्दुल गालीब शेख  यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन केले.

 
Top