उस्मानाबाद / प्रतिनिधी-
घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही. परंतु कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल, असे महाराष्ट्राच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी जिल्हाधिकारी तसेच जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून स्पष्ट केले आहे.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम रज्यात राबविण्यात येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री, यांच्या मार्गदर्शनाखाली १७ जुलै २०२२ रोजी घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशातील सर्व राज्याच्यामुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती. त्यामध्ये घरोघरी तिरंगा कार्यक्रमाबाबत काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम दि.13 ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे.
राज्याच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडून केवळ तिरंगा झेंडा उपलब्ध होणार असून यासोबत काठी मिळणार नाही.काठीची व्यवस्था करावयाची आहे. असेही राजेश कुमार यांनी यापत्रात स्पष्ट केले आहे.