उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे  आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना दहा हजार रुपयांपासून एक लाखांपर्यंतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत. तेंव्हा महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेत सर्व नव उद्योजक तसेच होतकरू उमेदवारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.

 या यात्रेतील मोबाईल व्हॅन ही राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय, लोकसमूह एकत्रित होणाऱ्या जागा या ठिकाणी जाऊन उद्योजकता आणि स्टार्टअपविषयी जनजागृती करेल. ही महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा 26 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. 26 ऑगस्ट - परांडा, 27 ऑगस्ट – भूम आणि वाशी, 30 ऑगस्ट-उमरगा, 01 सप्टेंबर – तुळजापूर आणि लोहारा, 02 सप्टेंबर-कळंब आणि उस्मानाबाद.

 सर्व तालुक्यामधील संबंधित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ही मोबाईल व्हॅन जाणार आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई - प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना पारितोषिके दिली जाणार आहेत. राज्यस्तरावर एकूण 26 विजेत्यांची निवड केली जाईल. जिल्ह्यांमध्ये उत्तम तीन विजेत्यांना 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार अशी पारितोषिके देण्यात येतील. विभागस्तरावर सहा सर्वोत्कृष्ट नवउद्योजक आणि सहा सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. राज्यस्तरावर 14 विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. यामध्ये प्रथम पारितोषिक एक लाख रुपये, तर द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये आहे. रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी www.mahastartupyatra.in / www.msins.in या संकेत स्थळांना भेट द्यावी. नोंदणीकृत उमेदवारांचे सादरीकरण दि.16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9:00 ते सायंकाळी 06:00 या वेळेत होणार आहे.


 
Top