उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्याचे मोठे भौगोलिक क्षेत्र व गावांची संख्या विचारात घेवून नळदुर्ग येथे अतिरिक्त तहसील मंजूर करण्याच्या मागणीसाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्टमंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. शिष्टमंडळा मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष  नितीन काळे, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, अॅड. दीपक आलूरे, उपाध्यक्ष विक्रम देशमुख, तालुकाध्यक्ष  संतोष बोबडे  यांचा समावेश होता.  

 नळदुर्ग शहराला वैभवशाली इतिहास असून प्राचीन काळी या शहराला अनन्यसाधारण महत्त्व होते. निजाम काळात विभागीय कार्यालय, जिल्ह्याचे केंद्र असा या शहराचा इतिहास आहे. तुळजापूर तालुक्यात १२३ गावे व दोन शहरे असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १४६००९.९२ हेक्टर आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या २,२६,५२७ आहे.

 या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र नळदुर्ग तालुक्याची अनेक दिवसांची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरुपात अप्पर तहसील कार्यालय नळदुर्ग येथे सुरु करणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मागील २.५ वर्षापासून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता, मात्र महाविकास आघाडी सरकारने हा प्रस्ताव रेंगाळत ठेवला होता. त्यामुळे या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती शिष्टमंडळाने  महसूल मंत्री यांच्याकडे केली.

  महसूल मंत्री   राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली.


 
Top