उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महावितरण कडून  ग्राहकांची व विशेषत: शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होत आहे. अनेक वेळा हेलपाटे मारुन देखील कामे केली जात नाहीत, खाजगी व्यक्तिकडून पैसे देऊन कामे करून घ्यावी लागतात. रोहित्र जळाल्यानंतर त्याची ने-आण करण्यासह काढणे व पुन्हा बसविणे अशी सर्व कामे देखील शेतकऱ्यांनाच पैसे देऊन करावी लागतात या प्रकारच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकाऱ्यांने आमुलाग्र बदल करण्याचा निर्धार आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 मौ.सकनेवाडी येथील शेतकरी श्री.रेवाप्पा कुदळे यांना उच्च दाब वितरण प्रणाली योजने अंतर्गत देण्यात आलेल्या वीज जोडणीचा पोल एक महिन्यात दोन वेळा पडल्याने महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कामाचा निकृष्ट दर्जा स्पष्ट होतो. उर्जितिकरण केल्यानंतर पोल पडल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे मोठा अपघात घडू शकतो. संबंधित शेतकऱ्याने वारंवार अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारुन देखील दुसऱ्यांदा पडलेला पोल लावण्यात आला नाही. उच्च दाब विद्युत वाहिनी असल्यामुळे याचे गांभीर्य जास्त आहे. या अनुषंगाने विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर अधिकाऱ्यांनी खुद्द उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनाच अर्धवट व असत्य माहिती दिली, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एक महिन्याच्या आत चौकशीचा अहवाल घेऊन दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे सभागृहाला आश्वासित केले आहे.

 कामाचा निकृष्ट दर्जा, कंत्राटदार व अधिकारी यांचे लागेबांधे, कामातील हलगर्जीपणा यामुळे महावितरणची कार्यपध्दती मागील दोन-अडीच वर्षात पूर्णत: ढेपाळली आहे. टेंडर प्रक्रिया न राबविता, कार्यारंभ आदेशाविना कामे केल्याच्या घटना जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे महावितरणची ही सुस्तावलेली व भ्रष्ट कार्यपध्दती सुधारण्याचा निर्धार आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. यासाठी सरपंच व ग्रामसेवकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. गावातील रोहित्र जळाल्यास अथवा इतर अडचणीची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएस अथवा ई-मेल द्वारे कळविण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. या पोहोच असलेल्या या तक्रारींवर महावितरणकडून कार्यवाही न झाल्यास जबाबदारी निश्चित करून संबंधिता विरुद्ध कडक कारवाई अवलंबिण्यात येणार आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही व कारवाई होतेय म्हंटल की कामात हयगय होणार नाही.

 महावितरणच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदलासह गतिमान प्रशासन व सेवा यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांशी या अनुषंगाने संवाद साधण्यात आला आहे. नागरिकांनी महावितरणबाबत च्या तक्रारी ग्रामपंचायत कार्यालया मध्ये द्याव्यात, संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांना सदरील तक्रारी कार्यकारी अभियंता, महावितरण यांच्याकडे एसएमएस अथवा ई-मेल द्वारे सुपूर्द  करण्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी ग्रुप कॉल द्वारे या विषयावर त्यांच्याशी साधलेल्या संवादा दरम्यान सूचित केले आहे.

 
Top