परंडा / प्रतिनिधी : - 

हिंदु धर्मातील पवित्र अशा श्रावण महिन्याचे औचित्य साधुन राजापुरा गल्लीतील भवानी शंकर मंदीर परिसरातील सर्व भावीक महिलांच्या वतीने सोमवारी दि. ८ रोजी भवानी शंकर मंदीरापासुन बँड पथक वाद्यासह कुर्डुवाडी रस्त्यावर असलेल्या समसमपुरा मारूती मंदीरात असलेल्या महादेवास जलाभिषेक करण्यास आयोजित केलेली कावड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

 या कावड यात्रेची सुरवात भवानी शंकर मंदीर पासुन दुपारी ४.३० वा. करण्यात आली. ही कावड यात्रा शहरातील जय भवानी चौक, मंडई पेठ, टिपु सुलतान चौक, मंगळवार पेठेतील प्रमुख मार्गावरून समसमपुरा मारूती मंदिरामध्ये पोहोचली. याप्रसंगी महिलांनी जय भोलेनाथ तसेच शिव पार्वती की जय असा जयघोष केला. मंदीरामध्ये महिला भाविकांनी कावडरूपी तांब्याच्या कलशात बरोबर आणलेल्या पाण्याने महादेवास जलाभिषेक करून व विधीवत पुजा - अर्चा करून महाआरती केली. परत येताना माहिलांनी कावडरूपी कलशात त्या मंदिराचे पाणी घेतले व छ. शिवाजी महाराज चौक मार्गे राजापुरा गल्ली मधुन भवानी शंकर मंदीरात येऊन मंदीरातील महादेवास जलाभिषेक केला व महाआरती करून सर्वांचे कल्याण करत सुख - समृद्धी प्राप्त होऊ दे, अशी महादेवास प्रार्थना केली यानंतर प्रसादाचे लाडू वाटप करण्यात आले. 

 शोभायात्रा प्रसंगी शंकर, पार्वती, अशोकसुंदरी, कार्तीकेय, गणेशजी व सखी अशा रूपात वेशभुषा केलेले बालगोपाळ कावड यात्रेतील प्रमुख आकर्षन ठरले व कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या महिलांनी सौभाग्याच लेण असलेल्या हळदी कुंकु रंगासारख्या लाल व पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या होत्या. कावड यात्रेसाठी मंदीर परिसरातील भाविक महिलांनी पुढाकार घेतला होता.


 
Top