उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या वृक्षलागवड चळवळी अंतर्गत हाडोंग्री येथील त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी गावातील भगवंत विद्यालय, पर्यावरण व वन्यजीव संवर्धन केंद्र आणि पुरातन महादेव मंदिर शिवकडा परिसरात सुमारे १५ हजार झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला.

या उपक्रमाचा शुभारंभ   जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांसह इतर ठिकाणी वृक्षलागवडीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून हाडोंग्रीकरांच्या पुढाकाराने १५ हजार वृक्षांची लागवड होत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. वृक्षारोपणासाठी हिरडा, बेहडा, अर्जुन, सादोडा, रिठा, बेल, बांबू, कवठ, इंग्रजी चिंच, आवळा, कडुनिंब यासारख्या औषधी वनस्पतींसह विविध फळझाडांच्या रोपांचा समावेश करण्यात येणार अाहे.


 
Top