उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेती-मातीच्या उदासवान्या जगण्याची कथा, निसर्गातील अद्भुत बदलांचे सक्षम चित्रण, स्त्री-पुरूष संबंधांवर मर्मपूर्ण भाष्य तर सामाजिक व्यवस्थेच्या जोखडात अडकलेले महिलांचे जीणे, अशा विविधांगी भावभावनांचे अफलातून प्रकटीकरण करीत महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या कवयित्रींनी उस्मानाबादकरांच्या काळजाचा ठाव घेतला. निमित्त होते प्रतिभासंभन्न कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मराठी कवयित्री संमेलनाचे. 

उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने रविवारी राष्ट्रीय मराठी कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या कवयित्रींनी एक से बढकर एक कवितांचे सादरीकरण करून रसिकश्रोत्यांच्या काळजाला साद घातली. कार्यक्रमाचे उद्घाटन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर मसापचे कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष किरण सगर, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, मसापच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, कवि संमेलनाचे अध्यक्ष संजीवनी तडेगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

उस्मानाबाद येथील ज्येष्ठ लेखिका कमलताई नलावडे यांच्या ‘लहरी’ या ललीतलेख संग्रहाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तकावर प्राचार्या डॉ. अनार साळुंखे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. कल्पना दुधाळ, योगिनी सातारकर-पांडे, अंजली कुलकर्णी, अनुजा जोशी, योजना यादव, भाग्यश्री केसकर आदींच्या कवितांना रसिकश्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. तर जयश्री जोशी, कविता मुरूमकर, डॉ. सुप्रिया आवारे, डॉ. शरयू आसोलकर, मनीषा पोतदार, सुनिता गुंजाळ यांच्या कविताही वाहवा मिळवून गेल्या. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या सुलभा देशमुख यांनी तर कवि संमेलनाचे अत्यंत वेधक असे सूत्रसंचालन डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार नितीन तावडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मसापच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहर व परिसरातील श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top